नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता श्रीलंकेच्या (IND vs SL) दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारत (Team India) तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टीम इंडियाचे प्रमुख शिलेदार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. यामुळं बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षकांपुढं श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत (Sri Lanka Tour) टीम इंडियाचा कॅप्टन कुणाला करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा उपकॅप्टन असणाऱ्या हार्दिक पांड्याचं नाव कॅप्टनपदाच्या शर्यतीत होतं. मात्र, निवड समिती आणि प्रशिक्षकांनी 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन दीर्घकालीन ध्येय डोळ्यासमोर ठेवत वेगळा विचार केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत.
अजित आगरकर अन् गौतम गंभीरचा कल सूर्यकुमार यादवच्या बाजूनं
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पसंती सूर्यकुमार यादवच्या नावाला असू शकते. कारण, सूर्यकुमार यादवकडे ते 2026 च्या टी 20 वर्ल्ड कप संघातील प्रमुख शिलेदार म्हणून पाहतात. भारतात 2026 चा टी 20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवनं यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्समध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये क्रिकेट खेळलेलं आहे.
सूर्यकुमार यादवनं नेतृत्त्व सिद्ध केलंय
भारतीय क्रिकेट संघाच्या यापूर्वी झालेल्या मालिकेत सूर्यकुमार यादवनं नेतृत्त्व केलं होतं. हार्दिक पांड्या जखमी असल्यानं संघात खेळत नव्हता. तर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमधून ब्रेक घेतलेला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवनं नेतृत्त्व केलं होतं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला होता. भारतानं ती मालिका 4-1 अशी जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती.
हार्दिक पांड्याच्या फिटनेस प्रश्न
हार्दिक पांड्या गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये जखमी झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर होता. हार्दिक पांड्या थेट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला. हार्दिकनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर हार्दिक पांड्यानं श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. हार्दिकनं वैयक्तिक कारणांमुळं माघार घेतली असल्याचं सांगितलं. 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी दीर्घकालीन विचार करत सूर्यकुमार यादवच्या नावाचा विचार श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
'टीम इंडियामधील युवा खेळाडू आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार'; रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव