India Women squad for Asia Cup 2026 : महिला आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने मागील संघात केवळ एकच बदल केला असून दुखापतग्रस्त श्रेयंका पाटील हिला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तिच्या जागी लेगस्पिन अष्टपैलू प्रेमा रावत हिला कायम ठेवण्यात आले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. यंदाच्या संघातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे लॉर्ड्स कसोटीत शानदार शतक झळकावूनही यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिला पुन्हा एकदा टी-20 संघात स्थान मिळालेलं नाही. तिच्याऐवजी निवडकर्त्यांनी 18 वर्षीय युवा यष्टिरक्षक जी कमालिनी हिच्यावरच विश्वास कायम ठेवला आहे.

Continues below advertisement

लॉर्ड्सवर शतक ठोकले तरी बाहेर

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत दमदार शतक झळकावत यास्तिका भाटियाने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिच्या या खेळीमुळे आशिया कप संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निवडकर्त्यांनी तिच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करत युवा जी कमालिनीलाच संधी दिली. त्यामुळे यास्तिकाला सलग दुसऱ्यांदा टी-20 संघाबाहेर राहावं लागलं आहे.

Continues below advertisement

श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर, प्रेमा रावतवर कायम विश्वास

संघातील एकमेव बदल श्रेयंका पाटीलच्या रूपाने झाला आहे. घोट्याच्या लिगामेंटच्या दुखापतीतून ती अद्याप पूर्णपणे सावरलेली नसल्याने तिची आशिया कपसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिच्या जागी लेगस्पिन अष्टपैलू प्रेमा रावत हिला कायम ठेवण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला आहे. 24 वर्षीय प्रेमा रावत हिला यापूर्वी महिला टी-20 विश्वचषकात संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने 2 चेंडूत नाबाद 3 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत तिने 2 षटकांत 21 धावा दिल्या, मात्र तिला एकही विकेट मिळाली नव्हती. तरीही तिच्या क्षमतेवर विश्वास दाखवत निवडकर्त्यांनी आशिया कपसाठीही तिला संघात कायम ठेवले आहे.

'द हंड्रेड'मध्ये भारताच्या 4 स्टार खेळाडू

दरम्यान, भारतीय महिला संघातील चार प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत खेळत आहेत. उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या चारही खेळाडू या स्पर्धेत व्यस्त आहेत. महिला आशिया कप स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीपासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत खेळवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 17 ते 22 सप्टेंबरदरम्यान जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियन गेम्स) होणार असून, त्या स्पर्धेतही भारतीय महिला संघाकडून सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा असेल.

2026 महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ (India Women squad for Asia Cup 2026)

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, रिचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, क्रांती गौर, रेणुका सिंग, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

राखीव खेळाडू : प्रतिका रावल, उमा चेत्री (विकेटकीपर), वैष्णवी शर्मा, सायली सातघरे आणि मिन्नू मणी.

हे ही वाचा -

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार?