Team India Squad for ODI and T20I Series : गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी 23 नोव्हेंबर रोजी भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा दुसरा दिवस रंगणार आहे. टीम इंडिया पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला लवकर आटोपून, शक्य तितक्या लवकर फलंदाजीला उतरण्याचा प्रयत्न करेल. पण याच दिवशी आजचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकाासाठी भारतीय संघाची निवड जाहीर होणार आहे, आणि सर्वांत मोठं कुतूहल या गोष्टीचं आहे, वनडे मालिकेचे नेतृत्व नेमकं कोणाकडे जाणार?

Continues below advertisement


30 नोव्हेंबरपासून वनडे, 9 डिसेंबरपासून टी20 मालिका


गुवाहाटी कसोटी संपल्यानंतर 30 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. त्यानंतर 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं या दोन्ही मालिकांसाठी आधीच आपला संघ जाहीर केला आहे, पण भारताचा अंतिम निर्णय रविवारी होणार आहे.


राहुल, पंत की रोहित... कोण होणार कर्णधार?


चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि बीसीसीआयची संपूर्ण निवड समिती पहिल्या दिवसापासूनच गुवाहाटीत उपस्थित आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच कर्णधाराच्या निवडीवर महत्त्वाची बैठक होणार आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह होतं, पण आता हे दोघेही वनडे मालिकेसाठी संघात असणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सिलेक्टर्ससमोरचा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे शुभमन गिलच्या जागी कर्णधार कोण? गिलला मानेला दुखापत असल्याने तो ही मालिका खेळू शकणार नाही, हे जवळपास ठरलेलं आहे.


उपकर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर असल्याने पर्याय मर्यादित आहेत. सर्वांत सोपा मार्ग म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्माकडेच नेतृत्वाची धुरा देणं. पण सिलेक्टर्स जर नवीन दिशेनं विचार करत असतील तर केएल राहुल हा पर्याय आहे.


याशिवाय, भविष्यातील नेतृत्व लक्षात घेऊन ऋषभ पंतचं नावही पुढे येत आहे. पंत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात होता, पण त्याला एकही सामना मिळाला नाही. आता या मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो आणि तीनही सामन्यांमध्ये प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवू शकतो. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


जैस्वालला मिळणार संधी?


इतर खेळाडूंविषयी बोलायचं तर गिल अनुपस्थित असल्याने यशस्वी जैस्वालला रोहित शर्मासोबत वनडे फॉरमॅटमध्ये ओपनिंगची सुवर्णसंधी मिळणार हे निश्चित आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते, तर कुलदीप यादवला लग्नामुळे रजेची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी येऊ शकते.


टी20 मालिकेत हार्दिक पांड्या खेळणार?


9 डिसेंबरपासूनच्या टी20 मालिकेतही गिलचे खेळणे कठीण दिसत आहे. त्यामुळे येथेही जैस्वालला ओपनिंगची संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनलादेखील टॉप ऑर्डरमध्ये मोठी भूमिका मिळू शकते. पण या मालिकेचा सर्वांत मोठा प्रश्न हार्दिक पंड्या परतणार का? आशिया कपदरम्यान जखमी झालेला हार्दिक गेल्या दोन महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. तो फिट झाला आहे का आणि खेळण्यासाठी उपलब्ध असेल का, याचा खुलासा रविवारी होणार आहे.


हे ही वाचा -


Aus vs Eng Ashes Test Series 2025 : पर्थ कसोटी जिंकून दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनं मागितली 60,000 प्रेक्षकांची माफी... नेमकं काय घडलं?