England vs India Semi Final T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघासाठी सुरुवातीपासूनच अभिषेक शर्माचा फॉर्म ही चिंतेची बाब ठरली आहे. आधी आजारपणामुळे तो संघाबाहेर होता आणि त्यानंतर पुनरागमन करताच सलग तीन शून्यांवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या जागेबाबत सेमीफायनलपूर्वी मोठी चर्चा रंगली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याची प्लेइंग इलेव्हनमधील जागा कायम राहणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल याने स्पष्ट संकेत दिल्याने चित्र स्पष्ट झालं आहे.
अभिषेक शर्मा खेळणार? (Will Abhishek Sharma play IND vs ENG Semi Final)
अभिषेकच्या खराब फॉर्ममुळे ईशान किशन किंवा संजू सॅमसन यांच्याकडून सलामी करवावी, अशी मागणी होत होती. पण सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत मोर्ने मोर्केल याने या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने अभिषेकला ठाम पाठिंबा दर्शवला आणि वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध अभिषेकने याआधी झळकावलेल्या शतकाची आठवण करून दिली. त्यामुळे सेमीफायनलमध्ये त्याची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे.
अभिषेकच्या फॉर्मबाबत बोलताना मोर्केल म्हणाला, “कधी कधी क्रिकेट तुमच्यासमोर कठीण आव्हानं उभी करतं. अशीच परिस्थिती संजू (सॅमसन) यांच्याही करिअरमध्ये आली होती. प्रत्येक खेळाडूला अशा टप्प्याला सामोरं जावं लागतं. अभिषेकसाठीही ही मोठी शिकवण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी हे त्याला नक्कीच मदत करेल. तो पुन्हा लयीत येण्यासाठी फक्त एक-दोन फटक्यांपासून दूर आहे.”
तो पुढे म्हणाला, “तो असा खेळाडू आहे जो तंत्रावर जास्त विचार करत नाही. अशा खेळाडूंना आत्मविश्वास परत मिळवायला थोडा वेळ लागतो. पण उद्याचा सामना त्याच्यासाठी नवी सुरुवात ठरेल. ह्याच मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं आहे, तेही फार पूर्वीची गोष्ट नाही.”
वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माने ठोकले शतक...
मोर्केलच्या या वक्तव्यानंतर इतकं स्पष्ट झालं आहे की इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अभिषेक शर्मा खेळताना दिसणार आहे. आता साऱ्या नजरा त्याच्यावर असतील, तो या मोठ्या मंचावर संधीचं सोनं करतो का? गेल्या वर्षी वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध त्याने 54 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी साकारली होती. आता पुन्हा एकदा तोच करिश्मा घडतो का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हे ही वाचा -
