Team India ODI Squad For England Tour Marathi News : भारतीय संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याला पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात सुरुवातीला 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल, ज्यानंतर 14, 16 आणि 19 जुलै रोजी 3 सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली असून, गेल्या मालिकेच्या तुलनेत संघात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.

Continues below advertisement

6 दिग्गज खेळाडू संघाबाहेर (India ODI Squad For England)

फेब्रुवारी 2025 मध्ये भारतामध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे मालिकेच्या तुलनेत यंदाच्या संघातून तब्बल 6 दिग्गज खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

Continues below advertisement

शतक ठोकूनही यशस्वी जैस्वाल बाहेर! (India ODI Squad For England)

निवड समितीचा सर्वात धक्कादायक निर्णय युवा फलंदाज यशस्वी जैस्वालबाबत राहिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावूनही त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. दुखापतग्रस्त विराट कोहलीचा पर्याय म्हणून जयस्वालला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली होती, मात्र आता विराटच्या पुनरागमनामुळे यशस्वीला संघाबाहेर जावे लागले आहे. जैस्वालसोबतच युवा फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यांनाही संघात स्थान टिकवता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध छाप पाडणाऱ्या या खेळाडूंपेक्षा सिलेक्टर्सनी अनुभवी खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.

विराट, बुमराह आणि अक्षर पटेलचे पुनरागमन

इंग्लंडविरुद्धच्या या दौऱ्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने अक्षर पटेलला पुन्हा संघात बोलावण्यात आले आहे. तरुण गोलंदाज हर्षित राणा आणि गुरनूर ब्रार यांनी आपले स्थान कायम राखले आहे, तर शुभमन गिलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India ODI Squad For England Tour) :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

हे ही वाचा -

IND vs IRE T20 Series : बीसीसीआयने टीम इंडियासाठी दिली बॅड न्यूज! भारताचा नंबर-1 बॉलर आयर्लंड विरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर, नेमकं काय घडलं?