ICC Champions Trophy Update नवी दिल्ली: भारत 2027 पर्यंत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. पाकिस्तान देखील कोणत्याही मालिकेसाठी भारतात 2027 पर्यंत येणार नाही. यासंदर्भातील अधिकृत घोषणा 7 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आयसीसीनं आज होणारी बैठक 7 डिसेंबरला घेण्यचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेल लागू करण्यात आल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी, महिला वर्ल्ड कप, आशिया कप असो किंवा भारत आणि श्रीलंकेत  2026 मध्ये आयोजित केला जाणारा टी 20 वर्ल्ड कप असो दोन्ही संघ एकमेकांच्या देशांचा दौरा करणार नाहीत. सध्याच्या माध्यमांच्या प्रसारण हक्कांचा कालावधी 2027 ला संपणार असल्यानं तो निर्णय घेण्यात आला आहे. भारत या काळात पाकिस्तानचा दौरा करणार नाही, याशिवाय पाकिस्तान देखील भारतात येणार नाही. 

जय शाह यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर दुबईमधील मुख्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आयसीसीचे संचालक, स्टाफ आणि माध्यम हक्क भागिदारांची भेट घेतली. जय शाह यांनी आजचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आयसीसीच्या संचालकांचे आभार मानले.  

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत, अंतिम फेरीत प्रवेश केल्यास मॅचेस दुबईत होण्याची शक्यता आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्यास ते सामने लाहोरमध्ये होऊ शकतात.  तर, स्पोर्टस तकच्या वृत्तानुसार आयसीसीनं पीसीबीला अतिरिक्त रक्कम  देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.    

पाकिस्तान देखील भारतात येणार नाही, पीसीबीची विनंती मान्य?

भारतानं सुरक्षेच्या कारणावरुन पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हायब्रीड मॉडेलनं करावं अशी भूमिका भारताची होती. 2023 च्या आशिया कप प्रमाणं चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील हायब्रीड मॉडेल लागू करावं, असं भारतानं म्हटलं होतं. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. आता मात्र 2027 पर्यंत पाकिस्तान देखील भारताचा दौरा करणार नाही, अशी शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसात होऊ शकते. 

दरम्यान,  पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. फेब्रुवारी- मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 

इतर बातम्या :