Team India Narendra Modi Stadium : काळ्या मातीचा 'काळा' फेरा! नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन वर्षांत दुसऱ्यांदा टीम इंडियावर दु:खाचा डोंगर, कर्णधार सूर्याचा अशुभ योगायोग
Team India lost Narendra Modi Stadium venue : गेल्या 3 वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने केवळ दोन सामने गमावले आहेत आणि हे दोन्ही पराभव याच मैदानावर झाले.

Team India ICC Tournament Narendra Modi Stadium : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळला. मात्र या लढतीत भारताची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक ठरली आणि 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आयसीसी स्पर्धांमधील भारताच्या सलग विजयाच्या मालिकेलाही ब्रेक लागला. 2023 वर्ल्ड कप फायनलनंतर सुरू झालेली 17 सामन्यांची अजेय घोडदौड याच सामन्यात थांबली. विशेष म्हणजे, या दोन्ही पराभवांमध्ये अनेक बाबतीत आश्चर्यकारक साम्य दिसून येते.
अहमदाबादचं हे मैदान ‘अशुभ’
अहमदाबादचं हे मैदान भारतीय क्रिकेटसाठी जणू काही ‘अशुभ’ ठरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने केवळ दोन सामने गमावले आहेत आणि हे दोन्ही पराभव याच मैदानावर झाले. आणखी धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही वेळा खेळपट्टी काळ्या मातीची होती आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याने दोन्ही सामन्यांत नेमक्या 18 धावा केल्या.
2023 च्या आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यातही सूर्यकुमार फक्त 18 धावांवर बाद झाला होता. आता 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास जणू पुन्हा लिहिला गेला. दक्षिण आफ्रिकेने 187 धावांचा मजबूत डोंगर उभारला आणि भारताचा डाव अवघ्या 111 धावांत गुंडाळला गेला. सूर्यकुमारने 22 चेंडूत 18 धावांचीच खेळी केली.
काळ्या मातीची खेळपट्टी भारतासाठी घातक ठरली?
गेल्या 30 आयसीसी सामन्यांत भारताला फक्त दोनच पराभव पत्करावे लागले आहेत आणि ते दोन्ही अहमदाबादमध्ये. या दोन्ही सामन्यांत काळ्या मातीची खेळपट्टी निर्णायक ठरल्याचं बोललं जातं. अशा पिचवर वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त उसळी आणि मदत मिळते, तर पुढे जाऊन फिरकीलाही थोडा टर्न मिळतो.
मात्र, या दोन्ही पराभवांमध्ये भारताची फलंदाजीच मोठा कमकुवत दुवा ठरली. सुरुवातीला विकेट्स गमावणे, मोठी भागीदारी उभारण्यात अपयश आणि दबावाखाली चुकीचे फटके... या सगळ्यांनी भारताचा घात केला. त्यामुळे काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळताना भारताला विशेष आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसते.
अहमदाबाद भारतासाठी नकोसं ठिकाण?
अहमदाबादचं हे मैदान आता भारतासाठी असं पहिलं होम वेन्यू ठरलं आहे, जिथे तीन मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये पराभव पत्करावा लागला. वनडे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही स्पर्धांतील पराभव इथेच झाले. 2006 मध्ये वेस्ट इंडिजने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला याच मैदानावर पराभूत केलं होतं. तेव्हा या मैदानाला मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. एकूणच, अहमदाबादचं मैदान टीम इंडियासाठी यशापेक्षा जखमा जास्त देणारं ठरत आहे. आता या अपयशातून सावरत भारत पुन्हा विजयाच्या मार्गावर कसा परततो, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -





















