सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून (7 जानेवारी) सिडनी येथे सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नवदीप सैनी या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे, बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. या कसोटीतून रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार असून तो सलामीला उतरेल. मयांक अग्रवालऐवजी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.


दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज उमेश यादवऐवजी नवदीप सैनीला सिडनी कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. उमेश यादवने डाव्या पोटरीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी नवदीप सैनीची भारतीय कसोटी क्रिकेट संघात संधी देण्यात आली आहे.


दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करेल. भारताला मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरी कायम ठेवावी लागणार आहे. तर दुसर्‍या कसोटीतील पराभवाला मागे सारुन तिसरी कसोटी कशी जिंकता येईल असा ऑस्ट्रेलियाला संघाचा प्रयत्न असेल. तथापि, तिसर्‍या कसोटीसाठी संघ निवडणे ही दोन्ही संघांची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे.





असा आहे भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की सलामीची जोडी दिसू शकते. दुखापतीमुळे या दोन्ही फलंदाजांचा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात समावेश झालेला नव्हता.


दरम्यान बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाईल.