T20 World Cup 2026 Super-8 Scenario Group C News : टी-20 वर्ल्ड कपच्या 17व्या सामन्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इटलीने नेपाळचा धुव्वा उडवला. या सामन्यात इटलीने 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. नेपाळने प्रथम फलंदाजी करत 123 धावांवर समाधान मानले, पण इटलीने हे लक्ष्य अवघ्या 12.4 षटकांत एकही विकेट न गमावता सहज पार केले.
ग्रुप ‘सी’मध्ये रंगतदार समीकरणे
या विक्रमी विजयामुळे इटलीचा नेट रनरेट झपाट्याने सुधारला आणि ग्रुप ‘सी’मधील समीकरणे पूर्णपणे बदलली. वेस्ट इंडीजने दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांचा नेट रनरेट +1.625 इतका मजबूत असल्याने सुपर 8 मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.
दुसऱ्या स्थानासाठी तीन संघात लढत...
इंग्लंड, स्कॉटलंड आणि इटली यांच्यात आता दुसऱ्या स्थानासाठी चुरशीची लढत रंगली आहे. इटलीने नेपाळवर मोठा विजय मिळवत दोन सामन्यांत 2 गुणांसह आपले खाते उघडले आहे. त्यांचा नेट रनरेट आता +0.352 झाला असून त्यांनी इंग्लंडला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी, इंग्लंडची अवस्था बिकट
स्कॉटलंडने वेस्ट इंडीजकडून 35 धावांनी पराभव पत्करला असला तरी इटलीवर 73 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे दोन सामन्यांत 2 गुण आणि +0.950 असा नेट रनरेट त्यांच्याकडे आहे. तर, इंग्लंडने नेपाळला केवळ 4 धावांनी हरवले, मात्र वेस्ट इंडीजकडून 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दोन सामन्यांत 2 गुण असूनही -0.650 असा नकारात्मक नेट रनरेट त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत.
ग्रुप C – पॉइंट्स टेबल
| संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
| वेस्ट इंडिज (WI) | 2 | 2 | 0 | 4 | +1.625 |
| स्कॉटलंड (SCO) | 2 | 1 | 1 | 2 | +0.950 |
| इटली (ITA) | 2 | 1 | 1 | 2 | -0.352 |
| इंग्लंड (ENG) | 2 | 1 | 1 | 2 | -0.65 |
| नेपाळ (NEP) | 2 | 0 | 2 | 0 | -1.854 |
इंग्लंडसमोर ‘करो या मरो’ची वेळ
सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. विशेषतः इटली आणि स्कॉटलंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. जर या दोघांपैकी कोणत्याही संघाकडून इंग्लंडला पराभव पत्करावा लागला, तर स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अंग्रेजांचा पत्ता कट होऊ शकतो.
हे ही वाचा -
