T20 World Cup 2026, Pakistan Provisional Squad नवी दिल्ली :भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संघातील 15 खेळाडूंच्या नावाची यादी आयसीसीकडे सोपवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाही. मात्र, मिडिया रिपोर्टनुसार बोर्डाच्या एका विश्वसनीय सूत्राच्यावतीनं याबाबत माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही पद्धत यापूर्वी देखील वापरली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं खेळाडूंची नावं जाहीर न केल्यानं क्रिकेट प्रेमींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पाकिस्ताननं 15 जणांच्या टीममध्ये कोणाला संधी दिली आहे. हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. बाबर आझमला संधी मिळाली का? शाहीन आफ्रिदीला संधी मिळाली की नाही. याबाबत चर्चा सुरु आहेत. पाकिस्तानच्या संभाव्य 15 खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळाली असू शकते, याचा अंदाज लावण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघात कोणाला संधी?
मिडिया रिपोर्टनुसार बाबर आझमला संघात ठेवलं गेलं आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला देखील संधी मिळाली आहे. मात्र, शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त आहे. ऑलराऊंडर शादाब खान देखील संघाचा सदस्य आहे. शादाब खान देखील दुखापतीमुळं मे 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, त्यानं बीबीएल 2025-26 मधून कमबॅक केलं आहे. याशिवाय शादाबला जानेवारीत श्रीलंकेत होणाऱ्या टी 20 मालिकेत देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार ज्या खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत संधी देण्यात आली आहे, त्यातील बहुतांश खेळाडूंना टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आली आहे. खेळाडूंच्या यादीत फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, साइम आयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, नसीम शाह, उस्मान खान, मोहम्मद वासीम जुनिअर आणि सलमान अली आगा यांचा सामेवश आहे. विशेष बाब म्हणजे हारिस राऊफला संघात संधी मिळाली नसल्याच्या चर्चा आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपमध्ये एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध बिघडलेले असल्यानं पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार आहेत. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. मात्र, त्यानंतर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जायला नकार दिलेला. बीसीसीआयच्या धोरणानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वीपक्षीय मालिका होत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आमने सामने आल्यास सामने त्रयस्थ देशात खेळवले जातात. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान 15 फेब्रुवारीला आमने सामने येणार आहेत.