T20 World Cup 2026 Points Table Update Marathi : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले गेले असून स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचला आहे. अनेक लहान संघांनी दमदार कामगिरी करत बलाढ्य संघांना धूळ चारली. या निकालांचा थेट परिणाम पॉइंट्स टेबलवर झाला असून सुपर-8 ची शर्यत अधिकच रंगतदार बनली आहे. काही दिग्गज संघांवर स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर काही असोसिएट संघांनी पुढच्या फेरीकडे दमदार पाऊल टाकले आहे.

Continues below advertisement

ग्रुप अ : अमेरिकेचा विजयाचा श्रीगणेशा

ग्रुप अ मध्ये अमेरिका संघाने अखेर विजयाचे खाते उघडले. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध 93 धावांनी मोठा विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये तिसरे स्थान पटकावले. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 196 धावा उभारल्या. प्रत्युत्तर नेदरलँड्सचा डाव 15.5 षटकांत 103 धावांवर आटोपला. या विजयामुळे अमेरिका तिसऱ्या स्थानावर पोहोचली असून नेदरलँड्स चौथ्या स्थानावर घसरली आहे. या गटात भारत अव्वल स्थानावर कायम आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Continues below advertisement

ग्रुप ब : झिम्बाब्वेचा विजय, ऑस्ट्रेलियाची घसरण

ग्रुप ब मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत स्पर्धेत खळबळ उडवली. या विजयासह झिम्बाब्वेने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. श्रीलंका देखील दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला दोनपैकी एकच सामना जिंकता आला असून ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. आयर्लंड आणि ओमान यांना अद्याप विजयाची नोंद करता आलेली नाही.

ग्रुप  क : वेस्ट इंडिज अव्वल, इंग्लंड चौथ्या स्थानावर

ग्रुप क मध्ये वेस्ट इंडिजने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत पहिले स्थान मजबूत केले आहे. स्कॉटलंड एका विजयासह दुसऱ्या, तर इटली तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडलाही दोन सामन्यांत एक विजय मिळाला असला तरी नेट रनरेटमुळे ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत. नेपाळला मात्र दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून ते तळाशी आहेत.

ग्रुप ड : यूएईची आगेकूच, अफगाणिस्तान अडचणीत

ग्रुप ड मध्ये यूएईने कॅनडावर विजय मिळवत स्पर्धेतील पहिले यश साजरे केले. दोन सामन्यांत एक विजयासह ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. अफगाणिस्तानला मात्र अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकाही चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे; मात्र नेट रनरेटमध्ये फरक असल्याने क्रमवारी ठरली आहे.

एकूणच, सुपर-8 ची लढत आता अधिकच रंगतदार झाली आहे. प्रत्येक सामना समीकरणे बदलतोय आणि कोणता संघ पुढे जाईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे.

हे ही वाचा -

Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'