T20 World Cup Group B Qualification Scenario : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शुक्रवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गट ब मधील सामन्यात झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून क्रिकेट विश्वाला थक्क केले. 2007 नंतर विश्वचषकाच्या इतिहासात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत आपले सुपर-8 मधील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

फलंदाजांची चमकदार कामगिरी; 169 धावांचे आव्हान

सामन्याची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झाली. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर ब्रायन बेनेटच्या 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची शानदार खेळी केली. त्याला तदिवानाशे मारुमानी (35 धावा) आणि रायन बर्ल (35 धावा) यांनी मोलाची साथ दिली. अखेरच्या षटकांत कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या 13 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या, ज्यामुळे झिम्बाब्वेने 20 षटकांत 2 गड्यांच्या बदल्यात 169 धावांचा डोंगरासारखा पल्ला गाठला.

ऑस्ट्रेलियाची पडझड अन् शेवटी मोठा पराभव... 

170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 29 धावांत त्यांचे 4 आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. अनुभवी ग्लेन मॅक्सवेल (31) आणि मॅट रेनशॉ (65) यांनी जोडी जमवून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजीसमोर त्यांची धावगती मंदावली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. ब्लेसिंग मुझारबानीने भेदक मारा करत 17 धावांत 4 बळी घेतले, तर ब्रॅड इव्हान्सने 23 धावांत 3 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.

गट 'ब' मध्ये उलथापालथ! ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

झिम्बाब्वेच्या या विजयामुळे 'ग्रुप बी' मधील चुरस वाढली आहे. ओमाननंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे झिम्बाब्वेचे आता 4 गुण झाले आहेत. झिम्बाब्वेला आता आयर्लंड आणि श्रीलंका यांच्याशी दोन हात करायचे आहेत. या दोनपैकी केवळ एक सामना जिंकल्यास ते अधिकृतपणे सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. 

दुसरीकडे, माजी चॅम्पियन ऑस्ट्रेलियासाठी आता 'करो या मरो'ची स्थिती आहे. त्यांना ओमान आणि यजमान श्रीलंका या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने हरवणे अनिवार्य आहे. श्रीलंका स्वतः फॉर्ममध्ये असल्याने ऑस्ट्रेलियाचा पुढील प्रवास अत्यंत खडतर मानला जात आहे.

ग्रुप B - गुणतालिका
संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 0 4 3.125
झिम्बाब्वे 2 2 0 0 4 1.98
ऑस्ट्रेलिया 2 1 1 0 2 1.1
आयरलँड 2 0 2 0 0 -2.175
ओमान 2 0 2 0 0 -4.306

हे ही वाचा -

AUS vs ZIM T20 WC 2026 : टी-20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठी उलथापालथ, झिम्बाब्वेने इतिहास-भूगोल बदलला, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून OUT...