T20 World Cup 2026 1st Day : टीम इंडिया अन् पाकिस्तानचा विजय! तर रोमारियो शेफर्डची हॅट्ट्रिक... टी-20 वर्ल्डकपचा पहिलाच दिवस ब्लॉकबस्टर, नेमकं काय घडलं?
T20 World Cup 2026 1st Day Update : टी-20 वर्ल्डकप 2026चा थरारक श्रीगणेशा क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रोमांच, संघर्ष आणि ऐतिहासिक क्षणांची जणू मेजवानीच मिळाली.

T20 World Cup 2026 1st Day Update : टी-20 वर्ल्डकप 2026चा थरारक श्रीगणेशा क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रोमांच, संघर्ष आणि ऐतिहासिक क्षणांची जणू मेजवानीच मिळाली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या लढतीत 3 विकेट्सने विजय मिळवत दमदार सुरुवात केली. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने आपली ताकद दाखवत स्कॉटलंडवर 35 धावांनी स्पष्ट विजय मिळवला. कॅरिबियन संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने स्कॉटलंडला पूर्णपणे दबावात ठेवले.
दिवसाच्या अखेरच्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करत विश्वचषकातील आपली मोहीम विजयाने सुरू केली. मात्र, पहिल्या दिवसाचा खरा नायक वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्ड ठरला. त्याने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात हॅट्रिक घेत इतिहास रचला. त्याच्या धारदार आणि अचूक गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आणि हा दिवस अधिकच खास बनवला.
पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची दमछाक
टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानला अखेरच्या तीन चेंडूवर विजय मिळला . भारताला अकड दाखवणाऱ्या पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात खराब अवस्था झाली होती आणि मोठ्या उलटफेरीपासून ते थोडक्यात वाचले. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड्सने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था 18 षटकांत 7 बाद 119 अशी बिकट झाली होती. अखेरच्या दोन षटकांत 29 धावांची गरज असताना सामना नेदरलँड्सच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र 19व्या षटकाने सामन्याचं चित्र पालटलं.
लोगन व्हॅन बीकने टाकलेल्या 19व्या षटकात फहीम अशरफ आणि शाहीन आफ्रिदी यांनी तुफानी फलंदाजी करत तब्बल 24 धावा काढल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयाच्या दिशेने मोठा दिलासा मिळाला आणि अखेर तीन चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानने सामना जिंकला.
वेस्टइंडीजचा दणदणीत विजय
ग्रुप ‘सी’मधील दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीजने स्कॉटलंडवर 35 धावांनी मात करत विजयी सुरुवात केली. शिमरॉन हेटमायरच्या आक्रमक फलंदाजीनंतर रोमारियो शेफर्डच्या भेदक गोलंदाजीने स्कॉटलंडची पुरती दाणादाण उडवली. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीजने 20 षटकांत 5 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ 18.5 षटकांत 147 धावांत सर्वबाद झाला.
शेफर्डची ऐतिहासिक हॅट्रिक
वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्ड याने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात हॅट्रिक घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 17वे षटक टाकताना त्याने दुसऱ्या चेंडूवर क्रॉसला बाद केले. पुढच्याच चेंडूवर लिस्क शून्यावर तंबूत परतला, तर चौथ्या चेंडूवर ऑलिव्हर डेव्हिडसनला बाद करत शेफर्डने हॅट्रिक पूर्ण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सैफयान शरीफलाही बाद करत एका षटकात चार विकेट्स पटकावल्या.
सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा!
भारताने दणदणीत विजयाने टी-20 वर्ल्ड कप 2026 मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत टीम इंडियाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभत केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 161 धावा केल्या. सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या भारताला कर्णधार सूर्यकुमार यादवने सावरलं. सूर्यानं जबाबदारी घेत 84 धावांची झंझावाती, सामना जिंकवणारी खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळे वानखेडेवर पुन्हा एकदा सूर्या तळपला. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आवळा घातला. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने यूएसएची फलंदाजी कोलमडली. अखेरीस अमेरिका 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारू शकली. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली.
हे ही वाचा -





















