T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक आता रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. यामध्ये टीम इंडिया वरचढ असल्याचं दिसतेय. पण दुसरीकडे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सोमवारी सामना रंगणार आहे, तर मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळवायचं असल्याच भारताविरोधात विजय अनिवार्य आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आले आहे, त्यामुळे मिचेल मार्शच्या संघावर विश्वचषकाबाहेर जाण्याचं संकट ओढावलं आहे.
ग्रुप ए मध्ये 24 जून रोजी होणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही सामने जिंकून भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाला पराभूत करणे महत्त्वाचे आहे. पण आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची शक्यता असल्याच्या समोर आलेय. हा सामना रद्द झाल्यास सर्वात जास्त फायदा अफगाणिस्तानला होऊ शकतो.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट -
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेंट लुसियामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. विजांच्या कडकटासासह मुसळधार पाऊस होत असल्याचे दिसतेय. हवामान खूपच खराब असल्याचे दिसत आहे.
पुढील आठवडाभर सेंट लुसियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सोमवारी सामना होणार आहे. स्थानिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी सकाळी हलका पाऊस पडू शकतो. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आकाश निरभ्र राहील. पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील षटकांची संख्या कमी होऊ शकते. जर अति पाऊस पडला तर सामना रद्द होऊ शकतो.
भारत ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर फायदा कुणाला ?
सुपर 8 मध्ये भारताच्या नावावर सध्या 4 गुण आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत टीम इंडिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, ज्यामुळे भारताचे 5 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 3 गुण होतील. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावल. बांगलादेशविरोधात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाऊ शकतो.