Suryakumar Yadav Touches Feet Raghu : रायपूर येथे शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सात विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने जबरदस्त अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Continues below advertisement

सामना जिंकल्यानंतर रघुच्या पाया पडला...

मात्र, सामन्यानंतर घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव थेट टीम इंडियाचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट रघू याच्याकडे गेला आणि सर्वांसमोर त्याच्या पाया पडला. सूर्यकुमारच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली असून त्याच्या नम्र स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Continues below advertisement

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. त्यामुळे अनेकांनी सूर्यकुमार यादव संघात असावा की नाही, इथपर्यंत चर्चा केली होती. मात्र, सूर्यकुमार यादव आपण कमबॅक करु, यावर ठाम होता. अखेर कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारी खेळी साकारली. यामध्ये राघवेंद्र द्विवेदी यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले जाते. सूर्यकुमार यादव याच्याकडून द्विवेदी यांनी नेटमध्ये कसून सराव करुन घेतला. भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंच्या चमकदार यशामागे जे सहाय्यक कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करतात, त्यात टीम इंडियाचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट राघवेंद्र द्विवेदी, ज्याला खेळाडू प्रेमाने रघू भैया म्हणतात याचा मोठा हात आहे.

रघू उर्फ राघवेंद्र द्विवेदी कोण आहे?

कर्नाटकातील कुमटा गावचा मुलगा असलेल्या राघवेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी केवळ 21 रुपयांसह घर सोडले. त्यांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न मात्र हात फ्रॅक्चर झाल्यामुळे अपुरे राहिले. पण त्याने हार न मानता, हुबळीत स्थानिक खेळाडूंना नेटमध्ये बॉल टाकण्याचे काम सुरू केले. आता रघू भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून तो संघासोबत आहे. 2011 पासून तो संघासोबत कार्यरत असून, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांना सरावादरम्यान 150 किमी/तास वेगाने हाय-स्पीड थ्रोडाऊन देऊन फलंदाजी सुधारण्यात मदत करतात.

14 महिन्यानंतर अर्धशतक

भारत सूर्यकुमारच्या फॉर्ममध्ये परतण्याची आतुरतेने वाट पाहत होता. सर्वांना माहिती आहे की सूर्यकुमार हा एक महान टी-20 फलंदाज आहे शुक्रवारीच्या सामन्यात हे स्पष्ट झाले. त्याच्या फलंदाजीने भारताने 16 व्या षटकात 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले. कर्णधाराकडून या फॉर्मची सर्वांनाच वाट पाहावी लागली होती. काल, सूर्यकुमारने 14 महिने आणि 23 डावांनंतर अर्धशतक झळकावले.

यापूर्वी, सूर्यकुमारने 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्या सामन्यात, सूर्यकुमारने 35 चेंडूत 75 धावांची खेळी केली, ज्यामध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. 2025 च्या आशिया कपमध्ये तो पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावण्याच्या जवळ होता, परंतु त्याआधीच संघ जिंकला. 14 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात सूर्यकुमारने नाबाद 47 धावा केल्या.

हे ही वाचा -

Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?