T20 World Cup 2026 News : टी-20 वर्ल्डकप 2026 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र यावेळी फक्त भारताकडेच नव्हे, तर अनेक इतर संघांकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होत असून, त्यात अनेक असोसिएट देशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही असोसिएट संघांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या खेळाडूंकडे आहे. अशाच तीन कर्णधारांची ओळख आपण पुढे घेणार आहोत.
ओमानचा कर्णधार – जतिंदर सिंग
ओमान संघाचे नेतृत्व लुधियानात जन्मलेल्या जतिंदर सिंगकडे आहे. कोणतीही मोठी अकादमी किंवा औपचारिक प्रशिक्षण नसतानाही जतिंदरने आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे त्यांचे आदर्श असून, आज जतिंदर ओमानसाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2025 मध्ये कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्याने ओमानला पहिल्यांदाच आशिया कपसाठी पात्र करून दाखवले.
कॅनडाचा कर्णधार – दिलप्रीत सिंग बाजवा
कॅनडाच्या संघाची सूत्रे पंजाबच्या गुरदासपूरमध्ये जन्मलेल्या दिलप्रीत सिंग बाजवाकडे आहेत. 2003 मध्ये जन्मलेल्या दिलप्रीतने पंजाब अंडर-19 संघासाठी 130 धावांची जबरदस्त खेळी केली होती. मात्र पुढे संधी न मिळाल्याने 2020 मध्ये त्यांच्या पालकांनी कॅनडाला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. कॅनडामध्ये दिलप्रीतने आपल्या खेळाची छाप पाडली आणि ग्लोबल टी-20 कॅनडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला कॅनडियन खेळाडू ठरला. केवळ 23 व्या वर्षी वर्ल्ड कपसारख्या मोठ्या मंचावर संघाचे नेतृत्व करणे, ही त्याच्या गुणवत्तेची पावती आहे. त्याची आक्रमक फलंदाजी कॅनडासाठी मोठा तुरुपाचा एक्का ठरणार आहे.
अमेरिकेचा कर्णधार – मोनांक पटेल
अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. गुजरातमधील आनंद येथे जन्मलेला मोनांक, भारतात जसप्रीत बुमराहसोबत ज्युनियर क्रिकेट खेळला होता. मात्र करिअरला अपेक्षित दिशा न मिळाल्याने तो 2013 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाला. एक काळ असा होता की, त्याने क्रिकेट सोडण्याचाही विचार केला होता, पण नशिबाने पुन्हा एकदा त्याला या खेळाकडे ओढले. 2021 मध्ये अमेरिकेचा कर्णधार बनल्यानंतर, 2024 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून त्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का दिला. मोनांक आज अमेरिकन फलंदाजीचा कणा आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 34.66 च्या सरासरीने 2,288 धावा केल्या असून, त्यात 3 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. याशिवाय बहामासविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय शतकही त्याच्या नावावर आहे.
हे ही वाचा -