Team India T20i Captain Suryakumar Yadav : टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकूनही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अडचणीत सापडल्याची चर्चा रंगू लागली आहे. आयपीएल सुरू असतानाच आता त्याच्या नेतृत्वावर आणि फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या थिंक-टँकला सूर्याकुमारच्या सातत्याने कमी होत चाललेल्या धावांमुळे नाराजी आहे. कर्णधार म्हणून त्याचा विजयाचा टक्का प्रभावी असला, तरी वैयक्तिक कामगिरीत मात्र मोठी घसरण दिसून येत आहे. वर्ल्ड कपमध्येही त्याच्या एकूण धावांपैकी मोठा वाटा अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आला, पण महत्त्वाच्या मोठ्या सामन्यांमध्ये तो अपेक्षेप्रमाणे चमकू शकला नाही.
याचदरम्यान आता भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2028 ऑलिम्पिक आणि पुढील टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेऊन निवड समिती नव्या नेतृत्वाच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यर याचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा कर्णधार म्हणून असलेला अनुभव निवडकर्त्यांना आकर्षित करत आहे.
दरम्यान, सूर्याकुमारच्या खराब फॉर्ममागे त्याच्या उजव्या मनगटाची दुखापत हे मोठं कारण असल्याचंही सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो गेल्या काही महिन्यांपासून मनगटावर जाड टेपिंग बांधून खेळत आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना देखील तो वेदनेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्ल्ड कपदरम्यान नेट सेशनपूर्वी टीम डॉक्टरांकडून त्याच्या मनगटावर विशेष पॅडिंग केलं जात असल्याचंही दिसून आलं होतं. मात्र टीम मॅनेजमेंटने याकडे सामान्य थकवा म्हणून पाहिलं. आता मात्र ही दुखापत त्याच्या फलंदाजीवर स्पष्टपणे परिणाम करत असल्याचं मानलं जात आहे.
जुलै 2024 मध्ये नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सूर्याकुमारच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि सातत्य दोन्ही कमी झालं आहे. 45 सामन्यांत त्याने केलेल्या धावा त्याच्या जुन्या विक्रमांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्यातच वाढतं वय, फिटनेसच्या समस्या आणि संघात नव्या खेळाडूंना संधी देण्याची रणनीती यामुळे त्याच्यावरचं दडपण वाढत चाललं आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यर याला केवळ संघात पुनरागमनाचीच नव्हे, तर थेट कर्णधारपदाची संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मधल्या फळीत स्थिरता आणि शांत नेतृत्व देण्याची त्याची क्षमता निवडकर्त्यांना महत्त्वाची वाटत आहे. सूर्याकुमारने पुढील दोन वर्षे कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी अंतिम निर्णय निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटच्या हातात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत भारतीय क्रिकेटमध्ये मोठा नेतृत्वबदल पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा -
