Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेपॉकमध्ये आयपीएल 2026 चा 63वा सामना रंगला. या सामन्यात एम.एस. धोनी मैदानात उतरल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मात्र, चेन्नईच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात सीएसकेला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे, शानदार विजय मिळवत हैदराबादने प्लेऑफमध्ये धडाकेबाज एन्ट्री केली. यासोबतच गुजरात टायटन्स संघानेही प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. दरम्यान, चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा आता जवळपास मावळल्या आहेत.
सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 180 धावा उभारल्या. विजयासाठी 181 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या हैदराबादने 19 षटकांतच सामना जिंकत दमदार विजय नोंदवला.
हैदराबादच्या विजयात इशान किशन याने सर्वात मोठी भूमिका बजावली. त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर हेनरिक क्लासेन यानेही तुफानी फलंदाजी करत 26 चेंडूत 47 धावा ठोकल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 41 चेंडूत 75 धावांची भागीदारी करत चेन्नईच्या हातातून सामना हिसकावून घेतला.
3 संघ प्लेऑफसाठी पात्र, एक जागा शिल्लक
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हा प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ होता. आता, हैदराबाद आणि गुजरातनेही अव्वल चारमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता 5 संघ एका प्लेऑफ जागेसाठी स्पर्धा करतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांमध्ये पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचा समावेश आहे.
हे ही वाचा -
