Ravindra Jadeja World cup 2023 IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. विराट कोहलीने 85 धावांची दमदार खेळी केली. विराट कोहलीचा 12 धावांवर मिचेल मार्शने झेल सोडला. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, असे अनेकांचं मत होतं. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या मते, स्मिथची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जड्डूने त्याचे कारणही सांगितले.
स्टिव्ह स्मिथची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण, नवीन फलंदाजांना चेन्नईच्या खेळपट्टीवर येऊन फलंदाजी करणं, तितके सोपं नव्हते. स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे माझ्या मते स्मिथची विकेट सामन्याचा टर्गिंग पॉईंट होता, असे रविद्र जाडेजा याने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. जाडेजा ऑस्ट्रेलियन फलंदाजीबद्दल म्हणाला, "मला वाटतं स्मिथची विकेट हा सामन्यातील निर्णायक क्षण होता. जेव्हा तुम्ही स्टीव्ह स्मिथसारख्या फलंदाजाची विकेट मिळवता, तेव्हा विकेट पडल्यानंतर स्ट्राइक रोटेट करणं नवीन फलंदाजासाठी सोपं नसतं. त्यामुळे मला वाटतं, स्मिथचा विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. तेथून ऑस्ट्रेलियन संघ 119-3 आणि नंतर 199 वर ऑलआऊट झाला होता."
चेन्नईमधील परिस्थिती मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. येथे मागील दहा वर्षांपासून खेळत आलोय. संघासाठी दिलेल्या योगदानामुळे मी खूश आहे. भारतासाठी खेळत असलेला प्रत्येक सामना माझ्यासाठी मोठा आहे. प्रत्येक सामन्यात 100 टक्के देण्याचा प्रयत्न असतो. कधीकधी होते, कधी तसे होत नाही. पण सामना जिंकल्यानंतर आनंद होतोच, असे जाडेजा म्हणाला.
गोलंदाजी करायला सुरुवात केल्यानंतर पहिला चेंडू टाकताच खेळपट्टीचा अंदाज आला. त्यामुळे प्रत्येक चेंडू स्टम्पमध्ये टाकायला सुरुवात केला. त्यामध्ये स्मिथला टाकलेला चेंडू थोडा वळला अन् स्टम्प उडाले. चेन्नईची खेळपट्टी कसोटी सामन्यासारखी होती. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्याची गरज नव्हती. अचूक टप्प्यावर चेंडू टाकायचा होता, असे रविंद्र जाडेजा म्हणाला.
रविंद्र जाडेजाचा भेदक मारा -
भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा मध्यक्रम उखडून टाकला. रविंद्र जाडेजाने 10 षटकात फक्त 28 धावा खर्च करत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. जाडेजाने दोन षटकेही निर्धाव टाकली. जाडेजाने आपल्या दहा षटकांमध्ये स्टिव्ह स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले.