IND vs SA 1st T20I : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पहिल्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात झाली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे. ऋषभ पंत टी 20 संघाचे कर्णधारपद सांभाळणारा आठवा भारतीय खेळाडू आहे. भारतीय संघाने आवेश खान या वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे. तर दिनेश कार्तिकचं भारतीय संघात पुनरागमन झालेय.
एडन मार्करमला कोरोनाची बाधा -
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेकीवेळी सांगितले की, एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आलेय. मालिकेतील पहिल्या सामन्यातच खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. तसेच या मालिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. दोन्ही संघ तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत या मालिकेसाठी बीसीसीआयने बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पहिल्याच सामन्याआधी खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरु आहे.
भारतीय संघाची आजची प्लेईंग 11 पुढील प्रमाणे -
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल
दक्षिण आफ्रिका संघाची आजची प्लेईंग 11 पुढील प्रमाणे -
क्विंटोन डी कॉक, टेम्बा बावुमा, रस्सी वान डेर डुसेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरिअस, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, ऑनरीच नॉर्टजे, तबरेज शम्सी
रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेय. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. पण आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व सांभाळण्याचा अनुभव पंतच्या पाठीशी आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होती. तर 2021 मध्ये दिल्ली क्वालिफायर सामना खेळली होती. धोनीचा वारसा चालवण्याचा पंत नक्कीच प्रयत्न करेल. धोनीप्रमाणेच पंतही खेळाडूंना सपोर्ट करत असल्याचं म्हटलेय जातेय. फलंदाजीत क्विंटन डिकॉक धावांचा पाऊस पाडू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये डिकॉकने 508 धावांचा पाऊस पाडलाय. तर ईशान किशन भारताकडून सलामीला उतरणार आहे. ईशान किशन मोठी खेळी करु शकतो. त्याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांच्याकडूनही मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. तर दक्षिण आफ्रिकाकडून डेविड मिलर विस्फोटक खेळी करु शकतो.