Continues below advertisement

मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील रविवारचा सामना चांगलाच वादग्रस्त ठरला. मैदानाबाहेर या सामन्याला शिवसेना उबाठा पक्षासह काही राजकीय पक्षांनी थेट विरोध दर्शवला होता. तर, मैदानातही टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाक खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्याने हा वाद अधिक टोकाला गेला. खेळात राजकारण येत असल्याचेही काहींनी म्हटले. दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या यापुढील सामन्यांनाही शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला असून भारत-पाकिस्तान सामन्याच्या जाहिराती सोशल मीडियावर करू नका, अशी मागणी करत शिवसेनेनं(Shivsena) सोनी वाहिनीला पत्र दिले आहे. त्यानंतर, अगोदरच्या सामन्याला केलं पण आता जाहिराती केल्या जाणार नाहीत, असे सोनी टीव्हीकडून (Sony TV) शिवसेनेला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

आम्ही सोनी टीव्हीला पत्र दिलं होत की, सामन्यावेळी ज्या थिल्लर जाहिराती केल्या होत्या त्या थांबवायला हव्यात. मॅच दाखवताना सोशल मीडियावर भारत पाकिस्तान मॅच संदर्भात अशा थिल्लर जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत, अस सोनी टीव्हीने आम्हाला सांगितलं आहे. अश्लीशपणाने आम्ही या सामन्याची जाहिरात इथून पुढे कुठेही करणार नाही, असं लिखित पत्र देखील सोनी टीव्हीने शिवसेनेला दिलं आहे.

Continues below advertisement

भारत-पाक सामना प्रमोशन प्रकरणात सोनी नेटवर्क्सची माफी

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या प्रमोशनवरून निर्माण झालेल्या वादानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (Culver Max Entertainment Pvt. Ltd.) कंपनीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा नेते अखिल अनिल चित्रे यांना लेखी उत्तर दिले आहे. कंपनीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आमचा हेतू कधीच देशाचा किंवा सशस्त्र दलांचा अपमान करण्याचा नव्हता. आम्ही सदैव राष्ट्राच्या आणि सशस्त्र दलांच्या सोबत उभे आहोत. प्रमोशन मोहिमेमुळे भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगीर आहोत.” सोनी नेटवर्क्सने संबंधित प्रमोशन पोस्ट हटवून कंपनीच्या अंतर्गत टीमना पुढील मोहिमा राबविताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, “भविष्यात कोणतीही मोहिम नागरिकांच्या भावना दुखावणारी नसावी याची काळजी घेतली जाईल,” असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने प्रेक्षकांच्या अभिप्रायाला गांभीर्याने घेतले जात असल्याचे सांगत, आपल्या मनात राष्ट्र, प्रेक्षक आणि नागरिकांविषयी सर्वोच्च आदर असल्याचे पत्राद्वारे अधोरेखित केले आहे. दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील दुसरा टी-20 सामना उद्या रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता होत आहे. 

हेही वाचा

17 चौकार, 5 षटकार अन् स्मृती मानधनाचं 50 चेंडूत वादळी शतक, कांगारूंच्या गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले, विराट कोहलीला मागे टाकले