Smriti Mandhana-Palash Muchhal Postponed Wedding : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला होणारा विवाह सोहळा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीत मंडप सजला होता, सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण रविवारी सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने की पलाशने? याबद्दलची मोठी माहिती आता समोर आली आहे. पलाशची आई अमिताने खरा प्रसंग उघड केला.अमिता मुच्छल म्हणाल्या की, “स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे समजताच पलाश रडू लागला. हळद झाल्यामुळे आम्ही त्याला बाहेर पडू देत नव्हतो, पण पलाशला त्यांना भेटायला जायचे होते. पलाशला श्रीनिवासजींबद्दल खूप आदर आहे. ही बातमी त्याच्यासाठी मोठा धक्का होती.

तेव्हा पलाशनेच सर्वप्रथम म्हटलं की, 'वडिलांची तब्येत आधी ठीक होऊ दे, मग आपण लग्न करू.’ लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वप्रथम पलाशनेच घेतला.” स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच पलाशलाही अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. विवाहाआधीच दोन मोठे धक्के बसल्याने दोन्ही कुटुंबांवर ताण निर्माण झाला असून, सध्या सर्वांचे लक्ष श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृती सुधारण्याकडे लागले आहे. 

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत डॉक्टर काय म्हणाले होते? 

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉ. नमन शाह यांनी माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, “सकळी  11.30 वाजता श्रीनिवास मानधना यांना डाव्या बाजूला तीव्र छातीत वेदना जाणवल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसू लागली. त्यांना तत्काळ सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या कार्डियक एन्झाइम्समध्ये किंचित वाढ दिसून आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सतत निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे. आमचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. रोहन थानेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डिओग्राममध्ये कोणतीही गंभीर नवीन बाब आढळलेली नाही.”

डॉ. शाह पुढे म्हणाले, “त्यांना सतत ECG मॉनिटरिंगची आवश्यकता आहे आणि गरज पडल्यास एंजिओग्राफी करावी लागू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढलेला आहे, त्यामुळे सतत नजर ठेवणे गरजेचे आहे. हे शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे झाले असण्याची शक्यता आहे. लग्नसमारंभाची तयारी, धावपळ आणि सीझनचा प्रचंड ताण याचाही त्यावर परिणाम झाला असू शकतो.”

हे ही वाचा -

Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट