Smriti Mandhana : मराठमोळ्या स्मृती मंधानाने सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहेत. दक्षिण आफ्रिकाविरोधात सुरु असलेल्या तीन वनडे सामन्यातील पहिल्या दोन्ही सामन्यात स्मृती मंधानाने शतकी खेळी केली.  लागोपाठ दोन सामन्यात शतकं ठोकणारी स्मृती मंधाना पहिलीच भारतीय ठरली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधानाने शतकी खेळी केली. तिने 120 चेंडूमध्ये 136 धावांचा पाऊस पाडला. स्मृतीने पहिल्या वनडे सामन्यातही शतक ठोकले होते. 


स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शतकी खेळींच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये तीन विकेटच्या मोबदल्यात 325 धावांचा डोंगर उभारलाय. मालिकेत बरोबरी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासोबत  326 धावांचे विशाल आव्हान आहे. स्मृती मंधानाने 136 तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 103 धावांची झंझावती खेळी केली. 







दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतले. शेफाली वर्मा 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर हेमलता आणि स्मृती यांनी डावाला आकार दिला. पण हेमलता जम बसल्यानंतर बाद झाली. तिला फक्त 24 धावाच काढता आल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत हिने स्मृतीला शानदार साथ दिली. 







हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी तिसऱ्या विकेटसाठी रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. दोघांनी 171 धावांची भागिदारी करत भारताला भक्कम स्थितीमध्ये पोहचवले. भारतीय संघ सुस्थितीत पोहचला तेव्हा स्मृती मंधाना बाद झाली. स्मृती मंधानाने 120 चेंडूमध्ये 136 धावांची खेली केली. या खेळीमध्ये स्मृतीने 18 चौकार आणि दोन षटकार ठोकले. स्मृती बाद झाल्यानंतर अखेरच्या पाच षटकात हरमनप्रती कौर हिने धावांचा पाऊस पाडला. 



हरमनप्रीत कौर हिने रिचा घोष हिच्या  साथीने धावांची गती वाढवली. अखेरच्या चार षटकांमध्ये 55 धावा जोडल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपले शतकही पूर्ण केले. हरमनप्रीत कौर हिने तीन षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 88 चेंडूमध्ये नाबाद 103 धावांचे योगदान दिले. रिचा घोष हिने 13 चेंडूमध्ये तीन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. 






दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. Nonkululeko Mlaba हिला दोन विकेट घेण्यात यश मिळाले, त्याव्यतिरिक्त सर्व गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.