Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Smriti Mandhana ISWOTY Award: महाराष्ट्राच्या लेकीला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार; स्मृती मानधना ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी. काल दिल्लीतील सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

BBC awards Indian Sportswoman of the Year: महाराष्ट्राची लेक आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज असलेल्या स्मृती मानधना हिची 2025 सालच्या 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भारतीय महिला संघाने 2025 साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाच्या (Team India) या विजयात स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळेच स्मृती मानधना ही 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' पुरस्काराची मानकरी ठरली. सोमवारी दिल्लीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात बीबीसी पुरस्काराच्या मानकऱ्यांना गौरवण्यात आले. स्मृती मानधना ही महाराष्ट्रातील सांगलीची आहे. एका लहान शहरातून क्रिकेट खेळायला सुरुवात करुनही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे.
स्मृती मानधना ही सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे. परदेशात असल्यामुळे स्मृती मानधना कालच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. तिने एका ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल बीबीसीचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटसाठी 2025 हे वर्ष खूपच खास राहिले. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद असल्याची भावना स्मृती मानधना हिने बोलून दाखवली. बीबीसीच्या या पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या परीक्षकांच्या यादीत टेनिसपटू लिएंडर पेस, दीपा मलिक, अंजू बॉबी जॉर्ज यांचा समावेश होता.
29 वर्षांची स्मृती मानधना ही आजघडीला भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रमुख भाग आहे. तिने गेल्या काही वर्षांमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. आजघडीला स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ठरलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखली जाते. महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधना ही सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू्ंच्या यादीत ती तिसऱ्या स्थानी आहे. 2025 साली स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना अवघ्या 50 चेंडूत शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे.
BBC awards: बीबीसीच्या पुरस्कारांचे मानकरी
बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर (उदयोन्मुख खेळाडू): बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख
बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर: पॅरा-अॅथलीट प्रीती पाल
बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: नेमबाज अंजली भागवत



















