England vs India 1st Test : बेन डकेटचं शतक आणि झॅक क्राऊली, ज्यो रुटच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडनं लीड्स कसोटी 5 विकेट्सनी जिंकली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतानं इंग्लंडला 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडनं पाचव्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात हे आव्हान आरामात पार केलं. सलामीच्या बेन डकेटनं 21 चौकार आणि एका षटकारासह 149 धावांची खेळी केली. त्यानं क्राऊलीसह 188 धावांची भक्कम सलामी देऊन इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. क्राऊलीनं 65 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर ज्यो रुटनं बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथच्या साथीनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. 

टीम इंडियाच्या चार फलंदाजांनी इंग्लंड दौऱ्यातल्या या पहिल्याच कसोटीत पाच शतकं झळकावली होती. पण दोन्ही डावातल्या  खराब क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फटका बसला. दरम्यान यजमान इंग्लंडनं लीड्स कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने टीम इंडियाच्या चुकांवर अचूक बोट ठेवलं.

पहिल्या पराभवानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला की, हा एक अप्रतिम टेस्ट सामना होता. आमच्याकडे संधी होत्या, पण सोडलेल्या झेल आणि खालच्या फळीतील फलंदाजांचा अपयश यामुळे किंमत मोजावी लागली. काल आम्ही विचार करत होतो की इंग्लंडला 430 चं लक्ष्य देऊ, पण शेवटचे विकेट्स फक्त 25 धावांत गेल्या. आजही, पहिल्या विकेटनंतर आम्हाला वाटलं की सामना आपल्या हातात येईल, पण त्यानंतर संधी हातातून निसटल्या.

पुढे तो म्हणाला, पहिल्या डावातील कोलॅप्सबाबत आम्ही चर्चा केली, अशा चुका होतात, पण त्या दुरुस्त कराव्याच लागतील.  अशा खेळपट्ट्यांवर संधी सहज मिळत नाहीत, पण आमचा संघ युवा आहे आणि शिकत आहे. त्या चुका सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू.

शेवटी शुभमन गिल म्हणाला की, पहिल्या सत्रात आम्ही अतिशय शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजी केली. फारशा धावा दिल्या नाहीत, पण एकदा चेंडू जुना झाला की धावांचा ओघ थांबवणं कठीण जातं. त्यामुळे चेंडू जुना झाल्यावर सतत विकेट्स घेणं महत्त्वाचं ठरतं. जडेजाने अफलातून गोलंदाजी केली, संधी तयार केल्या, पण एक झेल असाही होता जो पंतच्या लक्षात आला नाही, असं घडतं कधी कधी.

बुमराह कोणते सामने खेळणार?

बुमराहबाबत हा प्रश्न विचारला असता कर्णधार शुभमन गिल म्हणाला, "हे प्रत्येक सामन्याच्या आधी ठरवलं जातं. आता बराच मोठा ब्रेक आहे, त्यामुळे पुढील सामन्याच्या जवळ आल्यावरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल."