Shubman Gill : भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल याच्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शुभमन गिल 11 तारखेला होणाऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. डेंग्यूची लागण झाल्यामुळे शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्याला मुकला होता. त्याच्या प्रकृतीमध्ये अद्याप हवी तशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे तो बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशन याला सलामीची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात इशान किशन शून्यावर बाद झाला होता. आता किशनकडे सिद्ध करण्याची आणखी एक संधी असेल. 


बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दिल्ली येथी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ दिल्लीला रवाना झाला आहे. पण डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल संघासोबत गेलेला नाही. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष देऊन आहेत. 






शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,  “भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल 9 ऑक्टोबर, 2023 रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणारा अफगाणिस्तानविरुद्ध पुढील सामना खेळू शकणार नाही.  तो चेन्नईतच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार आहे.”


ईशानला मिळणार संधी - 


चेन्नई येथे झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्याला सलामी फलंदाज शुभमन गिल मुकला होता. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल याला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळू शकला नाही.  त्याच्या जागी इशान किशन याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. गिल शून्यावर बाद झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धही शुभमन खेळणार नसल्यामुळे, त्याच्या जागी इशानलाच सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे. 


अफगाणिस्तानविरोधात मुकाबला -


वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येतील. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी नाणेफेक होईल. या मैदानावर झालेल्या आधीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. दक्षिण आफ्रिकेने 428 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेनेही येथे 300 पेक्षा जास्ता धावा चोपल्या होत्या. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.