England vs India Test Series Best Playing XI : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे युवा फलंदाज शुभमन गिल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त कामगिरी केली. अशा दर्जेदार कामगिरीनंतर हे दोघंही जागतिक क्रिकेटमधल्या कोणत्याही संघात सहज बसू शकतात. मात्र इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला मात्र हे कबूल नाही असंच वाटतं. कारण, ब्रॉडने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर जाहीर केलेल्या कॉम्बाइन्ड प्लेइंग इलेव्हनमधून त्याने गिल आणि जडेजा या दोघांनाही वगळलं आहे.
कसोटी मालिकेतील गिल आणि जडेजाची चमकदार कामगिरी
शुभमन गिलने या मालिकेत 5 कसोटीत 10 डावांत तब्बल 754 धावा, 4 शतके, आणि 75 च्या सरासरीने केल्या. तो मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने 516 धावा करताना एक शतक व 5 अर्धशतके ठोकली. याशिवाय, त्याने गोलंदाजीतही 7 बळी घेतले आणि मालिकेतील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून नाव कमावले. मात्र या कामगिरीकडे ब्रॉडने साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतं.
ब्रॉडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण कोण?
प्रथम आपण पाहूया की स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी मालिकेनंतर भारत-इंग्लंडच्या एकत्रित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश केला आहे. त्याने यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांना सलामीवीर म्हणून ठेवले आहे. ब्रॉडने ऑली पोपला तिसऱ्या क्रमांकावर निवडले आहे. तर जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. हॅरी ब्रूक पाचव्या क्रमांकावर आहे, तर बेन स्टोक्स सहाव्या क्रमांकावर आहे. ब्रॉडने स्टोक्सला त्याच्या संघाचा कर्णधारही बनवले आहे.
ऋषभ पंतला स्टुअर्ट ब्रॉडने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे. वॉशिंग्टन सुंदरने आठव्या क्रमांकावर संघात स्थान मिळवले आहे. तर जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे संघातील तीन वेगवान गोलंदाज आहेत.
गिल आणि जडेजा यांची निवड का करण्यात आली नाही?
जर आपण ब्रॉडने निवडलेल्या संघाकडे पाहिले तर टॉप ऑर्डरमधील कोणत्याही खेळाडूची कामगिरी गिल किंवा जडेजापेक्षा चांगली झालेली नाही. तर मग प्रश्न असा आहे की ब्रॉडने त्यांची निवड का केली नाही? मालिकेत ते दोघे ज्या क्रमांकावर खेळले त्यामध्ये ते बसले नसण्याची शक्यता आहे. जरी त्या दृष्टिकोनातून संघ निवडला गेला असला तरी, गिल आणि जडेजा बाहेर असणे समजण्यासारखे आहे. परंतु, जर हे कामगिरीच्या आधारावर असेल, तर ब्रॉडने निवडलेला संघ समजण्यापलीकडे आहे.
स्टुअर्ट ब्रॉडचा प्लेइंग इलेव्हन संघ - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
