LSG vs PBKS IPL Match Fans Misbehaving Cheerleaders : आयपीएल 2026 मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, या थरारक सामन्यादरम्यान मैदानाबाहेर घडलेल्या एका लाजिरवाण्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही संघ मैदानात प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झुंज देत असताना स्टँड्समध्ये उपस्थित काही प्रेक्षकांनी सामना रंगतदार बनवणाऱ्या चीअरलीडर्ससोबत गैरवर्तन आणि अभद्र वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला.

स्टेडियममधील व्हिडीओ व्हायरल

स्टेडियममधून समोर आलेल्या व्हिडीओनुसार, परिस्थिती चिघळताच सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढे येत गोंधळ घालणाऱ्या चाहत्यांना कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर त्वरित कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंजाबचा दमदार विजय

मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेत शानदार शतकी खेळी साकारली. सलग सहा सामन्यांपासून सुरू असलेल्या पराभवाच्या मालिकेला पंजाबने अखेर पूर्णविराम दिला. अय्यरने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. हेल्मेट काढून हवेत हात उंचावत त्याने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला.

पंजाबचे 15 गुण, पण प्लेऑफचे तिकीट अजून बाकी 

या विजयामुळे पंजाब किंग्स 14 सामन्यांत 15 गुण आणि +0.309 नेट रनरेटसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. मात्र, अजूनही संघाचे प्लेऑफमधील स्थान अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. आता पंजाबचे भवितव्य रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर अवलंबून असेल. सध्या 14 गुणांवर असलेली राजस्थानची टीम हा सामना जिंकली, तर ती 16 गुणांसह पंजाबला मागे टाकत थेट टॉप-4 मध्ये प्रवेश करेल.

पण जर आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने राजस्थानचा पराभव केला, तर पंजाबच्या आशा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर टिकून राहतील. कारण कोलकात्याकडे मोठ्या फरकाने विजय मिळवत पंजाबपेक्षा चांगला रनरेट मिळवण्याची अजूनही संधी आहे.

हे ही वाचा -

Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम