Shoaib Akhtar On Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानला सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात मोठे बदल केले आहेत. तब्बल सात खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, कोचिंग स्टाफमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भाष्य केलं आहे. अख्तरच्या मते, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा सध्याच्या संघावरील विश्वास जवळपास संपला असून, आता त्यांचं लक्ष भविष्यासाठी नवा आणि युवा संघ तयार करण्यावर आहे. मात्र, या बदलांच्या प्रक्रियेत तीन स्टार वेगवान गोलंदाजांच्या कारकिर्दीला धक्का लागू नये, अशी महत्त्वाची मागणी अख्तरने केली आहे.
सात खेळाडूंची हकालपट्टी, कोचिंग स्टाफमध्येही मोठा बदल
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला 194 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पीसीबीमध्ये बदलांचं सत्र सुरू झालं. बोर्डाने सरफराज अहमद आणि उमर गुल यांना कोचिंग सेटअपमधून हटवलं. त्यांच्या जागी माईक हेसन यांच्याकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज अॅश्ले नॉफ्के याचीही कोचिंग स्टाफमध्ये नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तानच्या संघातही मोठे बदल करण्यात आले. मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आगा यांच्यासह सात खेळाडूंना संघातून वगळण्यात आलं. एवढंच नाही तर रिझवान आणि इमाम यांची संघात निवड का करण्यात आली, याबाबत निवड समितीकडून पीसीबीने स्पष्टीकरणही मागितलं आहे.
‘बोर्डचा सध्याच्या खेळाडूंवर विश्वास नाही’
पाकिस्तान क्रिकेटमधील या घडामोडींवर शोएब अख्तरने आपली भूमिका मांडली. त्याच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे पीसीबी मोठ्या प्रमाणात निराश आहे. अख्तरने सांगितलं की, बोर्ड आता विद्यमान संघाकडे फारशा अपेक्षेने पाहत नाही. त्याऐवजी युवा खेळाडूंना संधी देऊन पाकिस्तानसाठी भविष्यातील संघ तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. अख्तरने पाकिस्तान क्रिकेटमधील बदलांचं समर्थन केलं असलं तरी तीन वेगवान गोलंदाजांसाठी त्याने विशेष विनंती केली आहे. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ यांच्या कारकिर्दीला या बदलांचा फटका बसू नये, असं अख्तरने म्हटलं आहे.
हे ही वाचा -
