Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) काल (15 फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एबीपीला प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी न्यूजवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, तुम्ही भारतीय असो किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. जर कोणता संघ त्यांना रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून 23 धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे, असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीसह पाकिस्तानचा चांगलेच सुनावले.
पाकिस्तान खूप मागे- (Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026)
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. भारत पुढील 100 वर्षांचे क्रिकेट खेळत आहे किंवा पुढील 50 वर्षांचे क्रिकेट आता खेळत आहे. पाकिस्तान खूप वाईट क्रिकेट खेळत आहे आणि जेव्हा या फॉरमॅटचा (टी-20 आंतरराष्ट्रीय) विचार केला जातो तेव्हा ते खूप मागे आहेत, हे वारंवार स्पष्ट होतंय, असं शोएब अख्तरने सांगितले.
सामना कसा राहिला? (Ind vs Pak T20 World Cup 2026)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.
