Mohali Kings Beat Amritsar soormas 1st match Sher E Punjab T20 League : शेर-ए-पंजाब टी-20 लीग 2026 च्या पहिल्याच सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर अमृतसर सुरमा आणि मोहाली किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. दोन्ही संघांनी मिळून तब्बल 520 धावा केल्या आणि टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रमांना गवसणी घातली. तब्बल 259 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहाली किंग्सने 5 विकेट्सने सामना जिंकला. अनमोलप्रीत सिंगच्या वादळी शतकासोबतच कर्णधार रमनदीप सिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर मोहालीने 19.3 षटकांत 5 विकेट्स गमावत 262 धावा करत हा अशक्य वाटणारा विजय मिळवला.
अनमोलप्रीत सिंगची वादळी खेळी, कर्णधार रमनदीप सिंहची मोलाची साथ
मोहाली किंग्सच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो अनमोलप्रीत सिंग ठरला. 259 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनमोलप्रीतने सुरुवातीपासूनच अमृतसरच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या 51 चेंडूंमध्ये 133 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या बॅटमधून तब्बल 10 चौकार आणि 12 षटकार निघाले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 260.78 इतका राहिला. अनमोलप्रीत एका बाजूने गोलंदाजांची धुलाई करत असताना कर्णधार रमनदीप सिंगनेही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 40 चेंडूंचा सामना करत नाबाद 69 धावा केल्या. रमनदीपच्या या खेळीमुळे अनमोलप्रीत बाद झाल्यानंतरही मोहालीच्या विजयाच्या आशा कायम राहिल्या. अखेर दोघांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मोहाली किंग्सने 19.3 षटकांत 5 विकेट्स गमावत 262 धावा केल्या आणि सामना आपल्या नावावर केला.
अभिषेक शर्माची 77 धावांची खेळी व्यर्थ
त्याआधी अमृतसर सुरमाचा कर्णधार अभिषेक शर्मा मैदानात उतरला आणि त्यानेही तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिषेकने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 77 धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्याच्यासोबत सहज धवनने 18 चेंडूंमध्ये 45 धावा, तर नमन धीरने 22 चेंडूंमध्ये 47 धावा ठोकल्या, ज्यामुळे अमृतसर सुरमाने 19.5 षटकांत 258 धावा उभारल्या.
एका सामन्यात विक्रमांची बरसात
शेर-ए-पंजाब टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात झालेला हा धावांचा महापूर क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला. 520 धावा, 15 विकेट्स, शेकडोच्या स्ट्राइक रेटने झालेल्या तुफानी खेळी आणि यामुळे हा सामना टी-20 क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरला. हे ही वाचा -
