Shahid Afridi on Pakistan Cricket : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा थरार येत्या 10 दिवसात रंगणार आहे, त्यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी नियमितपणे खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेचे आयोजन न्यूझीलंड करणार आहे. आयपीएल 22 मार्चपासून सुरू होईल.
नियमित कर्णधार मिचेल सँटनरला विश्रांती देण्यात आल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या मायकेल ब्रेसवेलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ब्रेसवेल व्यतिरिक्त, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेल्या इतर सहा खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्ताने पण या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर अष्टपैलू शादाब खानच्या निवडीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने टीका केली आहे.
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर शादाबला संघातून वगळण्यात आले होते, परंतु अलीकडेच त्याला पुन्हा संघात समाविष्ट करण्यात आले आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी उपकर्णधारपदही देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या लज्जास्पद कामगिरीनंतर, संपूर्ण संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला की, या चुकीच्या निर्णयांमुळे पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये आहे.
शाहिद आफ्रिदी पीसीबीवर संतापला
आफ्रिदीने कडक शब्दात म्हटले की, "त्याला (शादाबला) परत कोणत्या आधारावर संघात घेतले आहे? देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी किंवा इतर कोणत्याही कामगिरीमुळे त्याची पुन्हा निवडण्यात आले आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण तयारीबद्दल बोलतो आणि जेव्हा एखादी कोणतीही स्पर्धा येते, यामुळेच आपण अपयशी ठरतो. सत्य हे आहे की चुकीच्या निर्णयांमुळे पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये आहे."
आफ्रिदी असेही म्हणाले की, जेव्हा जेव्हा नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारतात, तेव्हा ते सर्वकाही बदलतात. हे पाकिस्तान क्रिकेटच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. माजी कर्णधाराने प्रश्न उपस्थित केला की, "बोर्डाच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये सातत्य, स्थिरता नाही. आपण कर्णधार, प्रशिक्षक किंवा काही खेळाडू बदलत राहतो, पण शेवटी बोर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी काय? कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या डोक्यावर डॅमोकल्सची तलवार सतत टांगत असताना आपले क्रिकेट कसे प्रगती करू शकेल?"
रिझवान आणि बाबर बाहेर
16 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानने अलीकडेच संघ जाहीर केला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना संघातून वगळण्यात आले आहे. रिझवानच्या जागी सलमान अली आगा याला पाकिस्तान टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर शादाबची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.
