Scott Edwards stepped down as captain of Netherlands : नेदरलँड्स क्रिकेट संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा देत क्रिकेटविश्वाला धक्का दिला आहे. जून 2022 पासून संघाची धुरा सांभाळणाऱ्या एडवर्ड्सचा कार्यकाळ शुक्रवारी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या युट्रेक्ट टप्प्यानंतर संपला. त्याच्या जागी स्टार अष्टपैलू बास डी लीडे याची नेदरलँड्सच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, तो लीग 2 मधील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.

Continues below advertisement

सहकाऱ्यांसमोर अचानक केली घोषणा (Netherlands Scott Edwards News)

रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (KNCB) ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये स्कॉट एडवर्ड्स म्हणाला, "अशी अचानक घोषणा करत असल्याबद्दल माफी मागतो. मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्य प्रशिक्षक रायन कुक आणि काही वरिष्ठांशी चर्चा झाली होती. हा निर्णय घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटले. खेळाडू म्हणून मी अजूनही संघासाठी खूप काही योगदान देऊ शकतो. नेदरलँड्सचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता आणि पुढेही मी ऑरेंज जर्सीत खेळत राहीन."

Continues below advertisement

कर्णधार म्हणून दमदार कामगिरी (Scott Edwards News)

पीटर सीलारच्या निवृत्तीनंतर जून 2022 मध्ये स्कॉट एडवर्ड्सकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. 56 वनडे सामन्यांमध्ये त्याने नेतृत्व केले आणि 24 विजय मिळवले, तर 29 सामन्यात पराभव पत्करावा लागला. 2023 वनडे विश्वचषकात भारतात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांना पराभूत करत मोठे उलटफेर घडवले. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर करण्यामध्येही नेदरलँड्सने महत्त्वाची भूमिका बजावली.

ICC आणि जय शाह यांच्या निर्णयावर केली होती टीका

अलीकडेच 2027 पुरुष वनडे विश्वचषकाच्या पात्रता फेरी आणि स्पर्धेच्या नव्या स्वरूपावर स्कॉट एडवर्ड्सने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशनमार्फत बोलताना त्याने आयसीसी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका केली होती. एडवर्ड्सचे म्हणणे होते की, आयसीसी एकीकडे क्रिकेटचा जागतिक विस्तार करण्याची भाषा करते, मात्र दुसरीकडे असे नियम तयार करते ज्यामुळे नेदरलँड्ससारख्या असोसिएट देशांच्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याच्या संधी आणखी कमी होतात. अनेक वर्षांच्या नियोजन आणि गुंतवणुकीनंतर असे बदल करणे छोट्या क्रिकेट राष्ट्रांसाठी निराशाजनक असल्याचे त्याने म्हटले होते.

सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर

नेदरलँड्सचा संघ सध्या CWC लीग 2 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या अखेरीस अव्वल चार संघांना विश्वचषक पात्रता स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. नेदरलँड्सचा पुढील दौरा वर्षअखेरीस ओमान आणि यूएई विरुद्ध होणार आहे.

हे ही वाचा -

Team India : मोहम्मद शमी, भुवनेश्वर IN; पंत, संजू OUT; चॅम्पियन खेळाडूने 2027 च्या वर्ल्डकपसाठी निवडला धडकी भरवणारा टीम इंडियाचा Full Squad