नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. संजू सॅमसन भारताच्या टी 20 संघाचा विकेटकीपर म्हणून खेळतोय. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे. मात्र, 2026 च्या आयपीएलमध्ये संजू सॅमसन नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भात वृत्त दिलं आहे.
राजस्थान रॉयल्स ऐवजी संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पाहायला मिळू शकतो. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स ट्रेडसाठी तयार झाल्याची माहिती आहे. दिल्ली कॅपिटल्स संजू सॅमसनसाठी उत्सुक असल्याची माहिती आहे.मात्र, त्यासाठी ते आपल्या टीमच्या कोअर प्लेअरला राजस्थाना द्यायला तयार नाहीत. संजू सॅमसनच्या पदलात ट्रिस्टन स्टब्सला राजस्थानला द्यायला दिल्ली तयार असल्याची माहिती आहे. ट्रिस्टन स्टब्सची प्राईस 10 कोटी रुपये आहे. मात्र, याबाबत औपचारिक घोषणा झालेली नाही.
संजू सॅमसनच्या बदल्यात केएल राहुलसाठी राजस्थान रॉयल्स आग्रही
रिपोर्टमधील दाव्यानुसार राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या बदल्यात के एल राहुलसाठी आग्रही होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्सनं त्याला तयारी दाखवली नाही. कॅपिटल्सच्या मते केएल राहुल टीमची ब्रँड वॅल्यू वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या हंगामात त्यानं दिल्लीकडून चांगली कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्स ट्रिस्टन स्टब्सच्या पर्यायवर आनंदी असून त्याशिवाय आणखी एका अनकॅप्ड खेळाडूची मागणी देखील त्यांनी दिल्लीकडे केली आहे. मात्र, दिल्लीनं त्याचा विचार केला नाही.
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सनं रिटेन करत आलेलं आहे. एका हंगामासाठी राजस्थान संजू सॅमसनला 18 कोटी रुपये दिले आहेत. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्स 14 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं होतं. आयपीएल 2026 मध्ये संजू सॅमसन कोणत्या संघाकडून खेळतो हे पाहावं लागेल. आता संजूच्या नावाची दिल्ली कॅपिटल्स सोबत चर्चा सुरु असली तरी यापूर्वी त्याच्या नावाची चर्चा चेन्नई सुपर किंग्ज सोबत झाली होती. रवींद्र जडेच्या बदल्यात संजूला चेन्नईच्या संघासोबत ट्रेड करण्याचा राजस्थानचा विचार होता.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समध्ये येण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होते.संजू सॅमसन 2013 पासून राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर 2021 मध्ये संजू सॅमसनकडे राजस्थानचं कर्णधार पद देण्यात आलं होतं. राजस्थानसाठी संजू सॅमसननं 149 डावांमध्ये 26 अर्धशतक आणि दोन शतकं केली असून 4219 धावा केल्या आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचं व्यवस्थापन संजू सॅमसन बाबत अंतिम निर्णय घेऊ शकतं. कारण, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सचा करार 2027 पर्यंत आहे. त्यामुळं संजू सॅमसनला टीममधून रिलीज करायचं की ट्रेड करायचं याबाबतचा अंतिम निर्णय राजस्थान रॉयल्सच्या मालकांच्या हातात आहे.
