Sanju Samson Dropped Ishan Kishan Wicketkeeping : न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका संजू सॅमसनसाठी अक्षरशः वाईट स्वप्नासारखी ठरली. या संपूर्ण मालिकेत सॅमसनला केवळ 46 धावा करता आल्या. दुसरीकडे, दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ईशान किशनने जबरदस्त फलंदाजी करत मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. या मालिकेआधीच संघातील सॅमसनच्या स्थानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, मालिकेच्या अखेरच्या सामन्यात घडलेल्या एका निर्णायक घटनेनंतर हे जवळपास स्पष्ट झालं आहे की टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा प्रमुख विकेटकीपर म्हणून ईशान किशनलाच पसंती दिली जाणार आहे. 7 फेब्रुवारीपासून भारत वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपल्या टी-20 वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करणार आहे.
सध्या संजू सॅमसन खराब फॉर्मशी झुंज देत असून न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो सातत्याने अपयशी ठरला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने केवळ 6 धावा केल्या आणि त्यानंतर त्याच्याकडून विकेटकीपिंगची जबाबदारीही काढून घेण्यात आली. ही जबाबदारी शानदार शतक झळकावणाऱ्या ईशान किशनकडे सोपवण्यात आली.
संजू सॅमसन पुन्हा एकदा स्वस्तात बाद...
अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेला संजू सॅमसन पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 103 धावांची वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही 63 धावांचे योगदान दिले आणि भारताने 5 विकेट्स गमावून तब्बल 271 धावांचा डोंगर उभा केला.
ईशान किशन विकेटकीपिंग करताना दिसला....
भारत गोलंदाजीसाठी उतरला, तेव्हा शतकवीर ईशान किशन विकेटकीपिंग करताना दिसला, तर संजू सॅमसन बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होता. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. एका युजरने ट्विट करत म्हटले, “ईशान किशन ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यावरून संजू सॅमसनला संपूर्ण टी-20 वर्ल्डकपमध्ये ‘हॅमस्ट्रिंग दुखापतीचं’ कारण दिलं जाऊ शकतं.”
या मालिकेत संजू सॅमसन सलग पाचव्या सामन्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपमधील त्याच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर तो बाद झाला. अभिषेक शर्माने (16 चेंडूत 30 धावा) चांगली सुरुवात दिली, मात्र फर्ग्युसनच्या वेगापुढे तोही टिकू शकला नाही.
दुखापतीमुळे चौथा टी-20 सामना न खेळू शकलेल्या ईशान किशनने पुनरागमन करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. डावखुऱ्या ईशानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अवघ्या 28 चेंडूत इश सोढीच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सलग दोन षटकार ठोकत 42 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.
हे ही वाचा -
