Manchester Super Giants champions The Hundred 2026 : मॅन्चेस्टर सुपर जायंट्सने पुरुषांच्या द हंड्रेड स्पर्धेचा ऐतिहासिक किताब आपल्या नावावर केला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात मॅन्चेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा 5 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संजीव गोएंका यांच्या मालकीखालील संघासाठी हा द हंड्रेडमधील पहिलाच हंगाम होता आणि पहिल्याच हंगामात त्यांनी विजेतेपदावर नाव कोरले.

Continues below advertisement

ट्रेंट रॉकेट्सने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 8 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात मॅन्चेस्टर सुपर जायंट्सने 98 चेंडूतच लक्ष्य गाठले. शेवटच्या काही चेंडूंमध्ये सामना चांगलाच रंगला होता. मात्र लियाम डॉसनने 98व्या चेंडूवर बेन सॅडरसनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

डकेट-एलनची सुरुवात, डोनाल्डची आक्रमक खेळी

ट्रेंट रॉकेट्सकडून बेन डकेटने 31, तर फिन एलनने 15 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 36 चेंडूंमध्ये 48 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एन्यूरिन डोनाल्डने आक्रमक फलंदाजी करत केवळ 19 चेंडूंमध्ये 38 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र कर्णधार सॅम बिलिंग्सला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या 4 धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडला तर खातेही उघडता आले नाही. त्यानंतर लुईस ग्रेगरीने 16 चेंडूंमध्ये 32, तर मिचेल सॅटनरने 16 चेंडूंमध्ये 20 धावा करत संघाला 158 धावांपर्यंत पोहोचवले. मॅन्चेस्टरकडून नूर अहमदने शानदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या.

टिम सिफर्टने धू धू धुतलं

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅन्चेस्टर सुपर जायंट्सला टिम सिफर्टने तुफानी सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या 23 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सिफर्टने 38 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि तब्बल 7 षटकारांच्या मदतीने 72 धावांची मॅचविनिंग खेळी केली. पॉल वॉल्टरने 14 चेंडूंमध्ये 22, तर कर्णधार जोस बटलरने 14 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या. सिफर्ट बाद झाला त्यावेळी मॅन्चेस्टर सुपर जायंट्स विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती. 78 चेंडूंनंतर संघाच्या 136 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर ट्रेंट रॉकेट्सच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले.

शेवटच्या क्षणी सामना अडकला, पण डॉसनने केला गेम ओव्हर!

हेनरिक क्लासेन आणि मायकेल ब्रेसवेल स्वस्तात बाद झाल्यामुळे सामन्यात पुन्हा रंगत निर्माण झाली. मात्र लियाम डॉसनने दबावाच्या क्षणी संयम राखला. 98व्या चेंडूवर बेनच्या गोलंदाजीवर त्याने षटकार खेचला आणि मॅन्चेस्टर सुपर जायंट्सला 2 चेंडू शिल्लक असतानाच 5 विकेट्सने विजेतेपद मिळवून दिले. या विजयामुळे संजीव गोएंका यांच्या क्रिकेटमधील फ्रँचायझीला पहिल्यांदाच मोठ्या यशाची चव मिळाली आहे. सुपर जायंट्सच्या फ्रँचायझी आयपीएलसोबतच एसए20 आणि महिला द हंड्रेडमध्येही सहभागी आहेत. आयपीएलमध्ये राइजिंग पुणे सुपर जायंट्स ही गोएंका यांचीच फ्रँचायझी होती, मात्र त्या संघाला विजेतेपद मिळवता आले नव्हते.

हे ही वाचा -

Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट