Sai Sudharsan Hit-Wicket GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन एका अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक पद्धतीने बाद झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सुदर्शन हिट विकेट झाला आणि विशेष म्हणजे सलग दुसऱ्या सामन्यात त्याच्यासोबत अशी घटना घडली. क्रिकेटमध्ये हिट विकेटचे प्रसंग फारच क्वचित पाहायला मिळतात, मात्र साई सुदर्शनच्या बाबतीत हा प्रकार आता जणू नकोसा विक्रम ठरत आहे. मुल्लांपूर येथे झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्स 215 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. संघाची धावगती वेगवान असताना साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला होता. दोघांमध्ये मोठी भागीदारी रंगली होती आणि गुजरात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती.
चौकार गेला, पण विकेटही गेली! (Sai Sudharsan IPL News)
गुजरातच्या डावातील 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हा विचित्र प्रसंग घडला. राजस्थानचा गोलंदाज ब्रिजेश शर्माने ऑफ स्टंपच्या बाहेर लो फुलटॉस टाकला. साई सुदर्शनने चेंडू ऑफ-साइडला स्क्वेअरच्या मागे मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेबाहेर चौकारासाठी गेला, पण फटका मारताना त्याच्या हातातून बॅट सुटली आणि थेट स्टंपवर जाऊन आदळली.
यामुळे पंचांनी त्याला हिट विकेट घोषित केले. विशेष बाब म्हणजे मागील क्वालिफायर-1 सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सुदर्शन अशाच प्रकारे बाद झाला होता. त्या वेळी बॅट हातातून सुटून आधी जमिनीवर पडली आणि नंतर स्टंपला लागली होती. यावेळी मात्र बॅट थेट स्टंपवर आदळली.
शुभमन गिलची प्रतिक्रिया झाली व्हायरल (Shubman Gill reaction viral)
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर मैदानावर काही क्षणांसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वतः सुदर्शनलाही नेमके काय घडले यावर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या बाजूला उभा असलेला कर्णधार शुभमन गिलही हा प्रकार पाहून स्तब्ध झाला. नाराजी गिल थेट गुडघ्यावर बसल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
नकोसा विक्रम साई सुदर्शनच्या नावावर (Unwanted Record to Sai Sudharsan's Name)
या यादीत आता साई सुदर्शन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा हिट विकेट होणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ही तिसरी हिट विकेटची घटना ठरली. टी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक प्रत्येकी तीन वेळा हिट विकेट झाले आहेत.
बाद होण्यापूर्वी खेळली दमदार खेळी
या दुर्दैवी बादीपूर्वी साई सुदर्शनने शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून 77 चेंडूंमध्ये तब्बल 167 धावांची भागीदारी उभारली, ज्यामुळे गुजरात टायटन्सचा विजय जवळपास निश्चित झाला.
आता अंतिम फेरीत RCB विरुद्ध लढत (RCB vs GT IPL Final 2026)
राजस्थान रॉयल्सवर मात करत गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 31 मे रोजी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरुद्ध होणार आहे. साई सुदर्शनच्या विचित्र बादीची चर्चा रंगली असली, तरी त्याच्या अर्धशतकाने आणि गुजरातच्या दमदार कामगिरीने संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले.
हे ही वाचा -
