India ODI Squad for New Zealand 2026 : भारतीय क्रिकेट संघाची पुढील एकदिवसीय (Ind vs Nz ODI) मालिका न्यूझीलंडविरुद्ध असून, या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने (BCCI) शनिवारी वनडे संघाची घोषणा केली. या संघात शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून पुन्हा संघात निवड झाली आहे. मात्र, मागील सामन्यात शतक झळकावूनही ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे खेळवलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडने 105 धावांची दमदार खेळी केली होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. याशिवाय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 31 डिसेंबर रोजी उत्तराखंडविरुद्ध त्याने 124 धावांची शानदार खेळी खेळली होती. तरीदेखील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघातून त्याला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया 

Continues below advertisement

वनडे संघ जाहीर झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली. ऋतुराज गायकवाडचा फोटो शेअर करत, त्याच्या नावाचा हॅशटॅग वापरून अश्विनने लिहिले की, “तुम्हाला कसंही वाटत असलं तरी उठून उभं राहा, तयारी करा, पॅड घाला, मैदानात उतरा आणि कधीही हार मानू नका. हे दुर्लक्षित करणं कठीण असतं, पण भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीची स्पर्धा अशीच असते.”

सोशल मीडियावर संताप

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी बीसीसीआयच्या निवड धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, “लाज वाटू द्या रे जरा.... बीसीसीआय पुन्हा तेच करत आहे. नुकतीच वनडे शतकी खेळी आणि उत्कृष्ट देशांतर्गत कामगिरी असूनही ऋतुराज गायकवाडला संघाबाहेर ठेवण्यात आलं, फक्त पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना जागा देण्यासाठी. सातत्य? गुणवत्ता? याला काही अर्थ उरला आहे का?”

इतकेच नव्हे तर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक चाहत्यांनी विचारले आहे की, जर कामगिरी आणि देशांतर्गत स्पर्धांतील फॉर्मला महत्त्व नसेल, तर अशा स्पर्धांचा उपयोग काय? याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना डावलण्यात आल्यानेही चाहत्यांमध्ये नाराजी आहे. सोशल मीडियावर निवड समितीला सवाल विचारले जात असून, शमीसारख्या खेळाडूला संघात स्थान का देण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ (India's ODI squad against New Zealand) -  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.