RR vs CSK IPL 2026 : 'थाला'विना CSKची गाडी रखडली, 15 वर्षांच्या मुलाने चोपलं, राजस्थाविरोधात चेन्नईचा लाजिरवाणा पराभव
IPL 2026 RR vs CSK Updates Marathi News : आयपीएल 2026 च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला.

पार्श्वभूमी
IPL 2026 RR vs CSK Cricket Score Updates Marathi News : आयपीएल 2026 च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केले....More
आयपीएल 2026 च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 127 धावांवर सर्वबाद झाला, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने केवळ 2 गडी गमावून 13 व्या षटकात 128 धावांचे लक्ष्य सहज गाठले. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूंमध्ये 52 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर यशस्वी जैस्वाल 38 धावांवर नाबाद राहिला.
ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन पहिल्याच सामन्यात फ्लॉप
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 51 धावांवरच CSK चा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. संघासाठी डावाची सुरुवात करणारे कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन पूर्णपणे अपयशी ठरले आणि स्वस्तात बाद झाले.
जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचे सुरुवातीचे धक्के
संजू सॅमसनला 6 धावांवर नांद्रे बर्गरने बोल्ड करत माघारी पाठवले. त्यानंतर आयुष म्हात्रे शून्यावरच बाद झाला. पुढे कर्णधार ऋतुराज गायकवाड 11 चेंडूत 6 धावा करून जोफ्रा आर्चरचा बळी ठरला. अवघ्या 8 चेंडूंमध्ये चेन्नईने 3 विकेट गमावल्या. त्यानंतर चौथा धक्का मॅथ्यू शॉर्टच्या रूपाने बसला; त्याला 2 धावांवर संदीप शर्माने बाद केले. पॉवरप्लेमध्येच CSK ने 38 धावांवर 4 महत्त्वाच्या विकेट गमावल्या.
रवींद्र जडेजाचा कहर
यानंतर रवींद्र जडेजाने एका षटकात दोन विकेट घेत CSK ला मोठा धक्का दिला. त्याने प्रथम सरफराज खान (12 चेंडू 17 धावा) याला बाद केले आणि लगेचच शिवम दुबे (6 धावा) यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे CSK ची अवस्था आणखी बिकट झाली आणि संघ 100 धावांपर्यंतही पोहोचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र शेवटी जिमी ओव्हर्टनने संयमी फलंदाजी करत 36 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि चेन्नईचा डाव 127 धावांपर्यंत नेला.
राजस्थान रॉयल्सकडून रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा, रवि बिश्नोई आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत संघाच्या गोलंदाजीला धार दिली.
वैभव सूर्यवंशीचं वादळ...
128 धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. वैभवने पहिल्याच चेंडूपासून आक्रमण सुरू केले आणि अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. वैभव बाद झाला तेव्हा राजस्थानची धावसंख्या 75 होती. वैभवने 17 चेंडूंमध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह 52 धावा केल्या. विजयाचा पाया रचला.