RR beat RCB by 6 wickets IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशीने खेळलेली तुफानी खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. सूर्यवंशीने अर्धशतक झळकावले आणि बंगळुरूच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. त्याच्या या वादळी खेळीमुळे राजस्थानने आव्हानाचा पाठलाग सहज पार केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत चौथा विजय नोंदवत 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, गतविजेत्या बंगळुरू संघाला या हंगामातील पहिल्याच पराभवाचा धक्का बसला, ज्यामुळे त्यांच्या विजयाच्या मालिकेला ब्रेक लागला.
विराट कोहलीची झुंज
या सामन्यात रियान पराग याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रजत पाटीदार यांच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीकडून फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. मात्र जोफ्रा आर्चर याने पहिल्याच चेंडूवर साल्टला शून्यावर बाद करत धक्का दिला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल (14) यालाही बाद करत आर्चरने दुसरे यश मिळवले. यानंतर कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो फार वेळ टिकू शकला नाही. त्याने 16 चेंडूत 7 चौकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर क्रुणाल पांड्या (1) आणि जितेश शर्मा (5) लवकर बाद झाले.
कर्णधार पाटीदारचं अर्धशतक
आरसीबीला सहावा धक्का टिम डेविड (13) याच्या रूपात बसला. त्याला ब्रिजेश शर्मा याने बाद केले. त्यानंतर रोमारियो शेफर्ड 11 चेंडूत 22 धावा करून रविंद्र जडेजा याचा बळी ठरला. कठीण परिस्थितीत कर्णधार पाटीदारने जबाबदारी उचलली. त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 63 धावांची शानदार खेळी केली. तसेच वेंकटेश अय्यर याने 29 आणि भुवनेश्वर कुमार याने 9 धावांचे योगदान दिले आणि आरसीबीने 20 षटकांत 8 विकेट गमावून 201 धावा केल्या. राजस्थानकडून आर्चर, ब्रिजेश शर्मा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.
एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB!
राजस्थान रॉयल्सने सामन्याची सुरुवात जबरदस्त करत अवघ्या 8 ओव्हर्समध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात 129 धावा ठोकल्या. वैभव सूर्यवंशी याने तुफानी फलंदाजी करत 25 चेंडूत 78 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याला ध्रुव जुरेल याचीही दमदार साथ मिळाली. जुरेलने 15 चेंडूत 38 धावा करत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. मात्र, या धडाकेबाज सुरुवातीनंतर सामना अचानक फिरला. सूर्यवंशी 26 चेंडूत 78 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच शिमरन हेटमायर शून्यावर माघारी परतला. या दोघांनाही क्रुणाल पांड्या याने बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
यानंतर राजस्थानची घसरगुंडी सुरूच राहिली. रियान पराग 5 चेंडूत केवळ 3 धावा करून बाद झाला. अवघ्या 5 धावांच्या अंतरात राजस्थानचे 3 विकेट्स पडले आणि त्यांच्या तुफानी गतीला अचानक ब्रेक लागला. 11 ओव्हर्सनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोअर 4 विकेट्सच्या बदल्यात 141 धावा असा आहे. तेथून ध्रुव जुरेलने एक बाजू सांभाळत संयमी पण प्रभावी फलंदाजी केली. जुरेलने 43 चेंडूंमध्ये नाबाद 81 धावा करत राजस्थान रॉयल्सला 18 षटकांत 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय रवींद्र जडेजा यानेही 25 चेंडूंमध्ये 24 धावांचे योगदान दिले.
हे ही वाचा -
