WTC Final 2023: टीम इंडिया (Team india) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. आता सामना सुरू होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर मात्र सामन्यापूर्वी तीन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. टॉसपूर्वी या तिनही प्रश्नांची उत्तरं रोहितला शोधावीच लागणार आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर असलेले तीन मोठे प्रश्न हे सर्व प्लेइंग 11 शी संबंधितच आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सहभागी न झाल्यानं टीम इंडियाच्या आणि परिणामी कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत काहीशा वाढल्या आहेत. या मोठ्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोणत्या तीन खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देणं योग्य ठरेल? याचा योग्य निर्णय रोहितला टॉसपूर्वी घ्यावा लागेल.
रोहितसमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या लंडनच्या ओव्हल ग्राउंडवरील खेळपट्टीवर दोन स्पिनर्ससह उतरणं योग्य ठरेल का? रवींद्र जाडेजानं काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच थक्क केलं आहे. अशातच परदेशी मैदानावर जाडेजाची गोलंदाजी अश्विनपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये जाडेजाचा समावेश असणं जवळपास निश्चित आहे. तसेच, अश्विनचा अनुभव पाहता टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये त्यालाही जागा मिळू शकते.
ईशान किशनची जागाही पक्की?
अपघातानंतर दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत अजुनही उपचार घेत आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विकेटकीपर फलंदाज म्हणून केएस भरतची निवड करण्यात आली. भरतनं उत्तम विकेटकिपिंग केलं खरं, पण फलंदाजीत मात्र तो छाप पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी मिळू शकते. किशनची फलंदाजीची शैली पंतसारखीच आहे आणि तसेच, यापूर्वीही अडचणीच्या वेळी संघासाठी त्यानं महत्त्वाची कामगिरी केली आहे.
तिसरा प्रश्न प्लेईंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या समावेशाचा आहे. शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्यात जागेसाठी लढत आहे. शार्दुलची खासियत म्हणजे, तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. शार्दुलकडे फलंदाजीमध्येही महत्त्वाचं योगदान देण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत उमेश यादवऐवजी शार्दुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स
• तारीख : 7 ते 11 जून, 2023
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
• रिझर्व डे : 12 जून
महत्त्वाच्या इतर बातम्या :