Rohit Sharma Rejects Mukesh Ambani Snack Offer : वानखेडे स्टेडियमवर शनिवारी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान मैदानावर जितका थरार पाहायला मिळाला, तितकेच काही रंजक क्षण मैदानाबाहेरही घडले. मुकेश अंबानी आणि भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा यांची भेट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंबानी कुटुंबीय मोठा मुलगा आकाश अंबानी पण हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
रोहित शर्मा चक्क अंबानींना नको बोलला, नेमकं काय घडलं?
सामन्यादरम्यान अंबानी कुटुंबाच्या व्हीआयपी बॉक्समधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉक्समध्ये पोहोचताच मुकेश आणि नीता अंबानी यांनी उभे राहून त्याचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. याच वेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुकेश अंबानी स्वतः रोहित शर्माला चहाचा कप देताना दिसले. मात्र रोहितने चहाला नकार दिला. या व्हिडिओवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सूर्यकुमार यादव एकटा नडला अन्...
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अमेरिकन संघाला एकटा नडला. सुरुवातीलाच झटपट विकेट्स पडल्याने भारत अडचणीत आला होता, मात्र सूर्यानं जबाबदारी स्वीकारत अफलातून फलंदाजी केली. त्याने 49 चेंडूत नाबाद 84 धावांची निर्णायक खेळी साकारली. या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ईशान किशन (20) आणि तिलक वर्मा (25) यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 161 धावा उभारल्या. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शल्कविक याने 29 धावांत 4 विकेट्स घेत प्रभावी गोलंदाजी केली.
भारतीय गोलंदाजांचा दमदार मारा
162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. मिलिंद कुमार (34), संजय कृष्णमूर्ती (37) आणि शुभम रंजने (37) यांनी झुंजार खेळी करत सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र विजयापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स घेत अमेरिकेच्या धावगतीवर नियंत्रण ठेवले आणि त्यांना 132 धावांवर रोखले. भारताकडून मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.
हे ही वाचा -
