Rohit Sharma PC India vs England Test : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये (IND vs ENG) सात मार्च रोजी मालिकेतील अखेरचा सामना होणार आहे. धर्मशालामध्ये दोन्ही संघाने कसून सराव केला. सामन्याच्या आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्रकार परिषद पार पडली.  इंग्लंडच्या बेन डकेट (Ben Duckett ) याच्या एका वक्तव्याचा रोहित शर्मानं खरपूस समाचार घेतला.  यावेळी रोहित शर्मानं ऋषभ पंत याचाही उल्लेख केला. दुखापतीमुळे पंत टीम इंडियाच्या बाहेर आहे. 


बेन डकेट काय म्हणाला होता ?


इंग्लंडविरोधातील मालिकेत भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल खोऱ्यानं धावा चोपतोय. त्याच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहे. त्याने लागोपाठ दोन द्विशतकेही ठोकली आहे. यशस्वी जायस्वालची फलंदाजी पाहून इंग्लंडच्या बेन डकेट यानं एक वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, यशस्वी जायस्वाल कसोटीमध्ये ज्या पद्धतीने आक्रमक खेळत आहे, त्याचं श्रेयस इंग्लंडला जायला पाहिजे. यावरुन बरेच राजकारण तापलं होतं. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन यानं बेन डटेक याचा क्लास घेतला होता. आता रोहित शर्मानेही बने डकेट याला उत्तर दिलेय. 


ऋषभ पंतचा खेळ पाहिला नाही वाटतेय, साहेबांना रोहित शर्माची चपराक


 बेन डकेट यानं यशस्वीबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रोहित शर्मा पंतचे उदाहरण देत तोंड बंद केलेय. रोहित शर्मा म्हणाला की, "भारतीय संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता. बेन डकेट यानं त्याची फलंदाजी पाहिली नाही का ? " रोहित शर्माने बेन डकेट याला ऋषभ पंत याच्या आक्रमक फलंदाजाची आठवण करुन दिली. पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करत अल्पवधीतच नाव कमावलेय. तो आता कमबॅकसाठी सज्ज झालाय. पंत आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय.






देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल, रोहित शऱ्मानं पुन्हा सुनावलं 


बीसीसीआयने सध्या भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावच याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे बीसीसीआयने नुकतेच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून वगळलं.  रोहित शर्मानेही देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल, असं वक्तव्य केलेय. रोहित शर्मा म्हणाला की, "मेडिकल टीमने प्रमाणपत्र देईपर्यंत प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळावच लागेल. सर्वांसाठी हे महत्वाचं आहे. मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना पाहिला. देशांतर्गत क्रिकेट आपलं मूळ आहे, त्याला महत्व देणं गरजेचं आहे."