मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानं टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा सध्या वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून खेळतोय. बीसीसीआयची आज मुंबईत बैठक झाली.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीवरुन जोरदार तर्क वितर्क सुरु होते. अखेर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माबाबतच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
सैकियांकडून सगळं चित्र स्पष्ट
देवजीत सैकिया म्हणाले की रोहित शर्माच्या भविष्याबाबत जे तर्क वितर्क सुरु आहेत त्याला प्रोत्साहन द्यायचं नाही. भारताचा माजी कर्णधार चांगली कामगिरी करतोय, असं सैकिया म्हणाले. बीसीसीआयची आढावा बैठक संपल्यानंतर सैकिया यांनी माध्यमांसोबत संवाद साधा. यावेळी ते म्हणाले की तो सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत आहे. तर तुम्हाला काय हवं आहे? गेल्या मॅचमध्ये इंग्लंड विरोधात त्यानं 138 धावा केल्या होत्या, तरी देखील तर्क वितर्क का लावले जात आहेत. यामुळं तर्क वितर्क लावणाऱ्यांना मसाला द्यायचा नाही, असं सैकिया म्हणाले.
सैकिया म्हणाले की निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आगरकर आढावा बैठकीला नव्हते. या बैठकीला शुभमन गिल,श्रेयस अय्यर, गौतम गंभीर, सीओईचे प्रमुख संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. मुंबईत नसल्यानं अजित आगरकर उपस्थित नव्हते. कारण ही बैठक कमी कालावधीत बोलावण्यात आली होती. अजित आगरकर मुंबईत नव्हते आणि ते अशा ठिकाणी होते, जिथून बैठकीला ऑनलाईन हजेरी लावणं देखील अशक्य होते, असं सैकिया म्हणाले.
निवड समितीचे प्रमुख म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत चर्चा झाली का असा सवाल सैकिया यांना विचारण्यात आला होता.यावर सैकिया यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असं म्हटलं. सैकिया यांनी व्हीव्हीएस लक्ष्मणची बीसीसआयच्या क्रिकेक संचालक म्हणून होणाऱ्या चर्चा फेटाळल्या आहेत. नव्या अफवांवर बोलत नाही, आम्ही अशा कोणत्याही चर्चा केल्या नाहीत, आमचा तसा उद्देश देखील नाही, असं सैकिया म्हणाले.
सैकिया यांनी बीसीसीआयकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत भाष्य केलं. आयसीसीला चार ठिकाणांची माहिती कळवण्या आली होती, त्यापैकी दोन ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. बीसीसीआय नेहमी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजानासाठी तयार असते. आम्ही कोणत्याही वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यामध्ये सक्षम आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजानाची वेळ जवळ आली असताना श्रीलंकेला ते करण्यात यश आलं नाही, असंही सैकिया म्हणाले.
