Rohit Sharma Declined KKR Offer : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा या शोच्या माध्यमातून रोहित नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्याच भागात रोहितच्या आयपीएल भवितव्याबाबत चर्चेला उधाण आणणारा एक प्रसंग समोर आला आहे. शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रोहितला अप्रत्यक्षपणे आपल्या संघात येण्याचा प्रस्ताव दिल्याचं पाहायला मिळतं. मात्र, रोहित शर्माने या प्रस्तावाला अवघ्या एका शब्दात उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.
अभिषेक नायरचा KKRमध्ये येण्याचा इशारा
रोहित शर्माच्या शोमध्ये अभिषेक नायर, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी रोहित पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत होता. दरम्यान, अभिषेक नायरने ‘सीएसके, सीएसके' असा नारा देत रोहितची मजा घेतली. त्यानंतर नायरने रोहितला पर्पल आणि गोल्ड रंगाचे कपडे त्याच्यावर चांगले दिसतील, असं सांगितलं. पर्पल आणि गोल्ड हे केकेआरच्या जर्सीचे रंग असल्याने नायरचा इशारा स्पष्ट होता. नायर अप्रत्यक्षपणे रोहितला कोलकाता नाईट रायडर्समध्ये येण्याचा प्रस्ताव देत असल्याचं या व्हिडीओमधून दिसतं.
चाहत्यांनी केला ‘मुंबई, मुंबई’चा जयघोष
अभिषेक नायरच्या या ऑफरनंतर उपस्थित चाहत्यांनी मात्र ‘मुंबई, मुंबई’ असा जयघोष सुरू केला. त्यानंतर रोहित शर्माने दिलेल्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रोहितने फक्त कायम सोबत एवढाच शब्द उच्चारला. रोहितच्या या उत्तराचा अर्थ त्याची मुंबई इंडियन्ससोबतची दीर्घकाळाची नाळ आणि निष्ठा असा घेतला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही रोहितच्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
2011 पासून मुंबई इंडियन्ससोबत
रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. 2013 ते 2020 या कालावधीत त्याने संघाचं नेतृत्व करत मुंबईला तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील मोठा काळ मुंबई इंडियन्ससोबत घालवला आहे. त्यामुळे त्याचा केकेआरमध्ये जाण्याचा विषय समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, शोमधील त्याच्या ‘Forever’ या उत्तरामुळे मुंबई इंडियन्ससोबतच्या त्याच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर केकेआरला कर्णधारपदाबाबत नव्या पर्यायाचा विचार करावा लागू शकतो, त्यामुळे रोहितच्या नावाची चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबतही चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र, रोहित शर्माने प्रत्यक्षात केकेआरकडून अधिकृत ऑफर स्वीकारली किंवा नाकारली आहे, याबाबत या व्हिडीओपलीकडे अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ‘Forever’ या शब्दाचा संदर्भ शोमधील या गंमतीदार प्रसंगापुरताच आहे की आयपीएल भवितव्याबाबतचा संकेत आहे, हे स्पष्ट होणं बाकी आहे.
हे ही वाचा -
