Rohit Sharma, World Cup : भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे 31 वं आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या 63 चेंडूंमधल्या शतकाला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज आहे. रोहित शर्माने या शतकी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहित शर्माने सचिनच्या सर्वाधिक षटकारांचा, ख्रिस गेलच्या सर्वाधिक षटकारांचा, विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा.. त्यासह कपिल देव यांच्या 40 वर्षांपूर्वीचा विक्रमही उद्धवस्त झाला. रोहित शर्माने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात 72 चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला.
भारतासाठी रोहित शर्माने सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. रोहित शर्माने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. त्याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 72 चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. 40 वर्ष हा विक्रम अबाधित राहिला होता. पण यंदा रोहित शर्माने हा विक्रम मोडीत काढला.
सर्वाधिक शतकांचा विक्रम
विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहेत. दोघांच्या नावावर विश्वचषकात 5 शतके आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार शतके ठोकली आहे. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही चार शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा -
रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.