Rishabh Pant steps down as LSG Captain : आयपीएल 2026 मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ताफ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरून तात्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने शुक्रवार, 29 मे रोजी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत पंतचा हा राजीनामा स्वीकारल्याची पुष्टी केली आहे. 2025 च्या लिलावात तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून लखनऊने पंतला आपल्या संघात सामील केले होते, मात्र अवघ्या दोनच हंगामात हा प्रवास संपला आहे.

Continues below advertisement

दोन वर्षांचा सुमार कार्यकाळ (Rishabh Pant steps down as LSG captain)

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊचा संघ दोन्ही हंगामात प्ले-ऑफ गाठण्यात अपयशी ठरला. आयपीएल 2026 मध्ये तर संघाची कामगिरी अतिशय लाजीरवाणी राहिली आणि संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी फेकला गेला. या हंगामात लखनऊला 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकता आले. यापूर्वी 2025 च्या हंगामातही संघाने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकले होते. एकूणच पंतच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 28 सामन्यांपैकी लखनऊला 10 सामन्यांत विजय मिळवता आला, तर 18 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.

Continues below advertisement

फ्रँचायझीची अधिकृत प्रतिक्रिया आणि टॉम मूडींचे वक्तव्य लखनऊ सुपर जायंट्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ऋषभ पंतने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी फ्रँचायझीने तात्काळ प्रभावाने मान्य केली आहे."

संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "ऋषभने स्वतः आमच्याकडे ही विनंती केली आणि आम्ही त्याचा आदरपूर्वक स्वीकार केला. असे निर्णय घेणे कधीही सोपे नसते. त्याने कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आता आमचे संपूर्ण लक्ष संघाची पुनर्रचना करण्यावर असेल."

पंतच्या फलंदाजीलाही ग्रहण (Rishabh Pant News)

कर्णधारपदाच्या दबावामुळे पंतच्या वैयक्तिक फलंदाजीलाही मोठा फटका बसला. 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 446 धावा करणाऱ्या पंतला लखनऊकडून खेळताना धावा करता आल्या नाहीत. 2025 मध्ये त्याने 269 धावा, तर 2026 मध्ये 312 धावा केल्या. 28 सामन्यांत त्याने 26.4 च्या सरासरीने आणि 135.74 च्या स्ट्राईक रेटने केवळ 581 धावा केल्या, ज्यामध्ये फक्त 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

नव्या कर्णधाराचा शोध सुरू

ऋषभ पंत आता केवळ एक खेळाडू म्हणून संघात राहणार की नाही, हे स्पष्ट नसले तरी लखनौ आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. संघात मिचेल मार्श, एडन मार्करम आणि निकोलस पूरन यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचा अनुभव असलेले तगडे पर्याय उपलब्ध आहेत.

हे ही वाचा -

GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : क्वालिफायर-2 पावसात धुवून निघाला तर कोणाची लागणार 'लॉटरी' अन् कोणाचा होणार 'गेम'? जाणून घ्या IPLचा अजब नियम