Rishabh Pant Late-Night Plea To Uttarakhand CM : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर एका वैयक्तिक काराणामुळे आहे. रात्री जवळपास 1 वाजता पंतने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर टॅग करत एक पोस्ट केली. उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचं पंतने सांगितलं आहे. पंतच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्याच्या तयारीत व्यस्त आहे. 15 ऑगस्टपासून गाले येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार असून, त्याआधी भारतीय संघ श्रीलंका XI विरुद्ध सराव सामना खेळत आहे. अशा महत्त्वाच्या क्रिकेट घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतने केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

मध्यरात्री पंतने मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती (Rishabh Pant Late-Night Plea To Uttarakhand CM)

ऋषभ पंतने आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना थेट संबोधित करत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करताना येत असलेल्या अडचणींचा उल्लेख केला. पंतने सांगितलं की, तो दिल्लीहून उत्तराखंडमध्ये यायचे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करूनही त्याला राहण्यासाठी योग्य, मोठी आणि मालकी असलेली जागा मिळत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. पंतच्या म्हणण्यानुसार, जमीन खरेदीच्या प्रक्रियेबाबत असलेली स्पष्टतेची कमतरता त्याच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांकडे या प्रक्रियेत मदत करण्याची विनंती केली.

‘मला माझ्या उत्तराखंडवर खूप प्रेम आहे...’ (Rishabh Pant Late-Night Plea To Uttarakhand CM)

ऋषभ पंतने आपल्या पोस्टमधून उत्तराखंडशी असलेलं भावनिक नातंही व्यक्त केलं. आपल्या राज्यात परत जाऊन तिथल्या लोकांमध्ये राहण्याची आणि राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. पंतच्या या पोस्टमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने कोणत्याही प्रकारची मोफत जमीन किंवा सरकारी भेट मागितलेली नाही. त्याने स्पष्ट केलं की, जर सरकारची परवानगी मिळाली तर तो सरकारी दरानेच जमीन खरेदी करण्यास तयार आहे. आपल्या राज्यात स्वतःचं पहिलं घर उभारण्याची त्याची इच्छा असल्याचंही त्याने सांगितलं.

‘मला फ्री जमीन नकोय...’

पंतच्या या भूमिकेमुळे त्याची पोस्ट आणखी चर्चेत आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल सरकारकडून भेट म्हणून जमीन मिळणं चांगली गोष्ट असेल, असं त्याने म्हटलं असलं तरी त्याला सरकारकडून मोफत जमीन नको असल्याचं स्पष्ट केलं. सरकारी प्रक्रियेनुसार आणि सरकारी दराने जमीन खरेदी करण्याची तयारी असल्याचं पंतने सांगितलं. मात्र ही प्रक्रिया नेमकी कशी करायची, याबाबतच आपल्याला स्पष्ट माहिती नसल्याचं त्याने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.

तीन वर्षांपासून सुरू आहे प्रयत्न 

ऋषभ पंतच्या पोस्टमधून त्याचा हा प्रयत्न नवीन नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल तीन वर्षांपासून तो उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करून आपला बेस तिथे हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. उत्तराखंडशी असलेलं आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपल्या मुळांकडे परतण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचं पंतच्या शब्दांतून दिसून येतं. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतला आपल्या जन्मभूमीत स्थायिक होण्यासाठीच प्रशासकीय प्रक्रियेच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं या पोस्टमधून समोर आलं आहे.

उत्तराखंडमध्ये सर्वाधिक कर भरणारा क्रिकेटपटू (Rishabh Pant highest tax-paying cricketer in Uttarakhand)

दरम्यान, ऋषभ पंतची आर्थिक स्थिती आणि उत्तराखंडशी असलेलं नातं यामुळेही त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पंतने तब्बल 23 कोटी 84 लाख रुपयांचा कर भरल्याचा दावा या माहितीत करण्यात आला आहे. त्यामुळे तो उत्तराखंडमधील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे. याआधीच्या आर्थिक वर्षातही पंतने जवळपास 10.5 कोटी रुपयांचा कर भरल्याचं सांगितलं जात आहे.

ऋषभ पंतची कमाई किती?

ऋषभ पंत हा भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण नेटवर्थ सुमारे 120 ते 150 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून त्याला दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळतात. याशिवाय IPLमधूनही त्याची मोठी कमाई होते. ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया पोस्ट, पेड कोलॅबोरेशन आणि डिजिटल कॅम्पेनमधूनही पंत मोठी कमाई करतो.

हे ही वाचा -

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?