नवी दिल्ली : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं रिषभ पंतकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. गुवाहाटी कसोटीत भारताचा 408 धावांनी पराभव झाला होता. कोलकाता कसोटीत भारताला 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियावर आणि प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका केली जात आहे. गुवाहाटी कसोटीतील पराभवानंतर रिषभ पंतनं एक पोस्ट करत क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे.
टीम इंडियानं कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली नाही हे रिषभ पंतनं स्वीकारलं आहे. रिषभ पंत म्हणाला की " ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही की आम्ही गेल्या दोन आठवड्यांमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं नाही. एक टीम आणि एक व्यक्ती म्हणून, आम्ही नेहमीच चांगली कामगिरी करु इच्छितो आणि अब्जावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो"
Rishabh Pant Apology : माफ खरा, आम्ही अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही
रिषभ पंतनं पुढं म्हटलं की, माफ करा आम्ही यावेळी अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही. मात्र, खेळ तुम्हाला शिकणं, गोष्टी स्वीकारणं आणि पुढं जाणं शिकवतो. एक टीम म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून भारताचं प्रतिनिधीत्व करणं आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, असं रिषभ पंतनं म्हटलं.
रिषभ पंतनं पुढं म्हटलं की, " आपल्याला माहिती आहे की ही टीम काय करु शकते. आम्ही एक टीम आणि एक व्यक्ती म्हणून ताकदीनं आणि चांगल्या प्रकारे पुनरागमन करण्यासाठी कष्ट करु, पुन्हा एकत्र होऊ,लक्ष केंद्रीत करु आणि नव्यानं सुरुवात करु, तुमच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद असं, रिषभ पंतनं म्हटलं.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रवास खडतर
भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2025-2027 च्या सायकलमध्ये आता 9 कसोटी सामने शिल्लक आहेत. भारताला 9 पैकी 7-8 मॅच जिंकाव्या लागतील. भारतानं यापुढे दोन कसोटी सामने गमावल्यास त्यांचा अंतिम फेरीत पोहोण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघ सध्या डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.