नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंगनं मोठा दावा केला आहे.ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया जिंकेल असा दावा रिकी पाँटिंगनं (Ricky Ponting) केला आहे. मालिका सुरु होण्यास तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावाधी असताना रिकी पाँटिंगनं ही भविष्यवाणी केली आहे. 
  


आयसीसीच्या हवाल्यानुसार रिकी पाँटिंगनं त्याच्या भविष्यवाणीत म्हटलं की ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताविरुद्ध 3-1 नं जिंकू शकतो.  ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी सामने जिंकेल, भारत एका कसोटीत विजयी होईल तर एक कसोटी अनिर्णित राहील, असं पाँटिंग म्हणाला.  


बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत यावेळी पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर अखेरची कसोटी 3 जानेवारी ते 7 जानेवारीला होणार होणार आहे. यामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट कसोटी  देखील होणार आहे.  


बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक


पहिली कसोटी- 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ 
दुसरी कसोटी- 06 ते 10 डिसेंबर, एडिलेड  
तिसरी कसोटी- 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन 
चौथी कसोटी - 26ते 30 डिसेंबर, मेलबर्न 
पाचवी कसोटी-03 ते 07 जानेवारी,सिडनी 


भारतानं 2023  मध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली


भारतानं 2023 मध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत विजय मिळवला होता. भारतानं ही मालिका 2-1 नं जिंकली होती. या मालिकेचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. त्यावेळी चार सामन्यांची मालिका होती.  


यातील पहिली कसोटी नागपूरमध्ये झाली होती, भारतानं ती मॅच एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. यानंतर दुसरी कसोटी देखील भारतानं 6 विकेटनं जिंकली होती. तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला होता, ऑस्ट्रेलियानं कसोटी 9 विकेटनं जिंकली होती. तर, अखेरची कसोटी ड्रॉ झाली होती.  


दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ आगामी काही महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटचे सामने अधिक खेळणार आहे. भारत बांगलादेश विरुद्ध खेळेल. ही मालिका भारतात होईल. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंडचं देखील आव्हान असेल. नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या :


क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश


..तर, पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होऊ शकणार नाही, माजी क्रिकेटपटूनं दिला सतर्कतेचा इशारा